मोहोळला ड्रामा नको, विकास हवा!
राजकीय तमाशामुळे तालुक्याचा गाडा रुतला;
नागरिकांचा संताप ओसंडून वाहतोय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेला उमेश पाटील विरुद्ध बाळराजे–राजन पाटील संघर्ष आता मोहोळ तालुक्याच्या विकासाच्या आड उभा ठाकला आहे. अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावरून निर्माण झालेल्या “हाय व्होल्टेज ड्रामाने” आणि दुसरीकडे बाळराजे पाटील व त्यांच्या समर्थकांच्या स्टंटबाजीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून मोहोळकरांनी आता दोन्ही गटांना स्पष्ट इशारा दिला आहे. तुमचा ‘ड्रामा थांबवा, विकासावर बोला!’
‘पाटील विरुद्ध पाटील’ वादामुळे तालुक्याचा विकास ठप्प
२०१७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत राजन पाटील यांचे सहकार्यांने उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील राजकारणात प्रवेश केला. काही दिवसांतच दोघांमध्ये ठिणगी पडली. आणि तेथून झाली राजकीय अस्तित्वाच्लया लढाईची सुरुवात. आणि काहीच दिवसांत उभय पक्षांत झालेले मतभेद यामुळे गेल्या काही वर्षांत मोहोळ तालुक्यात सतत संघर्षाचे वातावरण आहे. दोन नेत्यांतून वाढलेल्या या वैमनस्याचा सर्वाधिक फटका बसतोय तो तालुक्याच्या प्रलंबित कामांना आणि जनतेला. निवडणूक आली की लगबग, तर बाकीच्या काळात तालुक्याच्या विकासाची फाईल धूळ खात पडते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
आरोप–प्रत्यारोपांचा पूर, पण विकासाचे प्रश्न कोणीच हाताळत नाही
मोहोळ नगरपरिषद निवडणूक तापली असून भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि वंचित अशी सहा राजकीय प्रवाहांची स्पर्धा रंगत आहे. पण प्रचाराचा चेहरा मात्र विकासाऐवजी चिखलफेक, ट्रोलिंग, टोमणे, दुसऱ्यांना लक्ष्य करणारी वक्तव्ये असा झाला आहे.
दरम्यान, मोहोळचे नागरिक विनवणी करत आहेत, तुमचे “राजकारण पुरे! आमच्या शहराच्या रोजच्या समस्यांकडे बघा.” ४०–४५ हजार लोकसंख्या… पण मूलभूत सुविधांचाच कोलमडलेला चेहरा, शहर वेगाने वाढत आहे, पण सोयी–सुविधा त्याच जुन्या अवस्थेत.भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होऊन गेली. मात्र मोहोळमधील प्रमुख समस्यांना तोंड द्यावे लागते. मोहोळ करांच्या मुलभूत गरजा व सुविधा येथील राज्यकर्त्यांना आजपर्यंत पूर्ण करता आल्या नाहीत. शिक्षणाची चांगली सोय नाही, चांगल्या आरोग्याची सुविधा नाही, व्यवस्थित वीज नाही, कायमस्वरूपी पाणीपुरवठा नाही, दर्जेदार रस्ते नाहीत, कर भरूनही सुविधा कागदावरच, चार राष्ट्रीय महामार्ग असूनही बसस्थानकाची दयनीय अवस्था, शहरातील आतील रस्त्यांवर मोठे खड्डे, चिखल, वाहतूक कोंडी कर देणारी जनता शासनाच्या निष्क्रियतेने व राजकीय नेत्यांच्या उदासिनतेंनी त्रस्त झाली आहे.
‘कामापेक्षा वादच मोठे’ – मोहोळकरांचा आरोप
मागील काही महिन्यांत अंतर्गत गटारीच्या कामात ठेकेदारांची मनमानी, रस्ते उकरून ठेवणे, दुरुस्ती न करणे यामुळे नागरिकांचे जीवन हाल झाले. नागरिकांच्या तक्रारींना नगरपरिषद प्रतिसादच देत नाही.शाळा–महाविद्यालयांतील मुलांना वाहतुकीच्या समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव या सगळ्यावर कोणतीही योजना नाही.उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, नवीन नगरपरिषदेची इमारत या सगळ्या योजना फक्त फाईलवरच!
“निवडणुकीनंतर समाजकारण, कामकाज आणि विकास हवाच!”
निवडणुकीत राजकारण होणारच, पण त्यानंतर स्पष्ट धोरण, जबाबदार नेतृत्व आणि निर्णायक कामांची अपेक्षा नागरिकांमध्ये वाढली आहे.यंदा मोहोळकर सुशिक्षित, समजूतदार, काम करणारे उमेदवार निवडण्याच्या मनःस्थितीत आहेत. मोहोळची जनता प्रश्न विचारतेय, “तुमच्या भांडणांमध्ये आमचा विकास आणखी किती दिवस अडकवणार?” राजकीय स्टंटबाजी, आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक वैमनस्य… या नाट्यामुळे मोहोळचा विकास थांबलेला आहे. तालुक्याचा भविष्यकाळ, तरुणांचे रोजगार, मूलभूत सुविधा या सगळ्यांचा बळी कोणाच्या अहंकाराला द्यायचा? त्यामुळे मोहोळकरांनी स्पष्टपणे सांगितले आहे, मोहोळला ड्रामा नको… मोहोळला विकास हवा!
.png)
0 Comments