Hot Posts

6/recent/ticker-posts

आगामी निवडणुका ‘समविचारी आघाडी’सोबत लढवणार -खा. मोहिते पाटील

 आगामी निवडणुका ‘समविचारी आघाडी’सोबत लढवणार -खा. मोहिते पाटील



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या नव्या शहर कार्यालयाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील हुतात्मा शॉपिंग सेंटर येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाने शहरातील राजकीय समीकरणांना वेग आला असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका समविचारी पक्षांना आणि लोकांना सोबत घेऊन लढण्याचे संकेत दिले.

ते म्हणाले “सोलापूर जिल्हा शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये निश्चित परिवर्तन दिसून येईल. ज्यांना शक्य आहे त्यांना सोबत घेण्यास आम्ही तयार आहोत. कोणाबरोबर आघाडी करायची हे वरिष्ठ पातळीवर ठरेल आणि नेतृत्व जे निर्णय घेईल त्याची तंतोतंत अंमलबजावणी करू.”

त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आगामी महापालिका निवडणुकांत आघाडी निर्माण करण्यास खुले असल्याचे स्पष्ट झाले.

शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी सांगितले की, २०१२ सालच्या महापालिका निवडणुकीत याच कार्यालयातून काम करताना राष्ट्रवादीने तब्बल १७ नगरसेवक निवडून आणले होते.

ते म्हणाले “हे कार्यालय आमच्यासाठी शुभ आहे. याच ठिकाणावरून पुन्हा एकदा आम्ही सशक्त तयारी करणार आहोत आणि यंदाच्या महापालिका निवडणुकीत १७ पेक्षा जास्त नगरसेवक विजयी करून दाखवू.”

कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक नेते, महिलाअघाडी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यालयामुळे पक्षाची शहरातील संघटनात्मक तयारी अधिक बळकट होणार असून येणाऱ्या महापालिका निवडणुकांचे राजकीय तापमान वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) ने शहरात नव्या कार्यालयासोबत निवडणूक मोहिमेची सुरुवात केली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून आक्रमक रणनीती आखली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments