श्रीमंतांपेक्षा गरीब माणसेच सामाजिक प्रतिष्ठा सांभाळतात..
पैशाने व धनाने श्रीमंत असणारी माणसे स्वतःला खूप मोठे व धनवान समजतात. त्यांना गरिबांना बोलायला, गरिबांशी मैत्रीचे संबंध ठेवायला लाज वाटत असते. भावाचे लग्न असो, बहिणीचे लग्न असो, मित्राचे लग्न असो किंवा नातेवाईकांचे लग्न असो यांनी लग्नाला किंवा इतर कार्यक्रमाला जर त्यांना आमंत्रित केले तर हे श्रीमंत माणसे त्यांच्या कार्यक्रमाला जाणे जाणिवपूर्वक टाळतात. कारण त्यांना वाटते की, माझ्यासारखा मोठा माणूस गोरगरिबांच्या लग्नाला जर गेला तर आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल. आपण जर गरिबांच्या पंगतीला बसू लागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. म्हणून हे श्रीमंत महाभाग गोरगरिबांच्या कार्याला जाणे टाळतात. आणि श्रीमंतांच्या लग्नाला न आमंत्रित करता देखील स्वतःहून जातात. कारण त्यांना श्रीमंतांच्या लग्नाला जाणे म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा आणखीन वाढवून घेण्यासारखे आहे असे वाटते. हे श्रीमंत महाभाग गरिबांनी कार्यक्रमाला आमंत्रण देऊन सुद्धा जात नाहीत. आणि आपल्या स्वतःच्या कार्यक्रमाला गोरगरिबांना आमंत्रित करत नाहीत. त्यांना गोरगरीब जनतेला आमंत्रण पत्रिका देणे नको वाटते. त्यांना स्वतःच्या कार्यक्रमाला गोरगरिबांना बोलावणे म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा कमी करून घेतल्यासारखे वाटते. म्हणून गोरगरिबांना लग्नाला बोलावणे ते टाळतात. श्रीमंतांच्या कार्यक्रमाला न बोलावता देखील हजेरी लावतात. आणि त्यांची फुकटची गोड स्तुती करतात. श्रीमंतांना कोणत्या गोष्टीचा घमंड असतो हे कळायला मार्ग नाही. श्रीमंतांच्या लग्नाला जाणे त्यांना प्रतिष्ठेचे लक्षण वाटते पण गरिबांच्या लग्नाला जाणे म्हणजे प्रतिष्ठा कमी करून घेणे असे वाटते. श्रीमंत आणि गरीब हा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेला असतो. हे श्रीमंत महाभाग गोरगरिबांना आपल्यापेक्षा तुच्छ समजून त्यांना नावे ठेवतात. गोरगरिबांच्या लग्नाला नावे ठेवणे किंवा पोटासाठी पूर्ण कपड्यात नाचकम करणाऱ्या मुलींना बदनाम करतात आणि यांच्या मुली अर्धवट कपड्यात मिरवतात. तेव्हा त्यांची इज्जत जात नाही किंवा प्रतिष्ठा कमी होत नाही पण स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी नाचकाम करणाऱ्या मुलींना नावे ठेवायला यांना लाज वाटत नाही. गोरगरिबांच्या अंत्यविधीला ही माणसे जाण्यास टाळतात आणि श्रीमंतांच्या मातीला पांढऱ्या शुभ्र कपड्यात हमखास जातात आणि स्वतःचा मोठेपणा मिरवतात. महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे एक श्रीमंत भाऊ गरीब भावाच्या मुलीला लग्नासाठी आर्थिक हातभार लावत नाही. आमंत्रण देऊन सुद्धा भावाच्या मुलीच्या लग्नाला येत नाही. कारण भाऊ गरीब असतो आणि हा श्रीमंत असतो गरीब भावाच्या मुलीच्या लग्नाला यायला यांना लाज वाटते. कारण गरिबांचे लग्न व्हीआयपी आणि शाही थाटात होत नाहीत. गरिबांच्या लग्नाला राजकीय मंडळी व नोकरदार मंडळी येत नसल्यामुळे यांना वाटते की आपण जर गेलो तर आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल या भीतीपोटी ते भावाच्या मुलीच्या लग्नाला येण्यास टाळाटाळ करतात. गोरगरिबांमध्ये माणुसकी ठासून भरलेली असते. म्हणून ते माणुसकीच्या नात्याने आपल्या कार्यक्रमाला प्रत्येकाला आमंत्रित करतात मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो पण हे श्रीमंत माणसे त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाला गोरगरिबांना आमंत्रण सुद्धा देत नाहीत. श्रीमंतांना आमंत्रण देणे व लग्नात त्यांना मानाचा फेटा बांधून त्यांचा सत्कार करणे हे त्यांना चांगल्या प्रकारे जमते. परंतु गोरगरिबांना बोलावणे म्हणजे त्यांना स्वतःची प्रतिष्ठा कमी करून घेणे असे वाटते. म्हणून ते सख्ख्या गरीब भावाला व बहिणीला लग्नाला आमंत्रित करणे टाळतात. लग्न पत्रिकेवर भावाचे व भावाच्या लेकरांची नावे टाकायला देखील त्यांना लाज वाटते. आणि श्रीमंतांची नावे तसेच राजकीय व विविध क्षेत्रातील नोकरदारांची नावे पत्रिकेवर हमखास टाकतात. काही श्रीमंत महाभाग आपला भाऊ जर शेतकरी पेशात ऑफिसला भेटायला आला तर हे श्रीमंत माणसे आपल्या सहकाऱ्यांना म्हणतात की हा माझ्या घरातील नोकर आहे. परंतु तो माझा भाऊ आहे म्हणायला त्यांना लाज वाटते ही खरोखरच लोकशाही प्रधान देशात अतिशय दुःखद बाब आहे. पण विचार करायचा झाला तर खरी प्रतिष्ठा ही श्रीमंतीत नसून आपल्या वर्तनात असते. ज्याच्या घरातील सदस्यांचे वागणे नेक, चारित्र्यवान व शीलवान असते तेच खरे इज्जतदार असतात. आजकाल गरीब माणसेच आपल्या प्रतिष्ठेला सांभाळून आहेत. श्रीमंतांच्या मुली बिघडलेल्या असतात तसेच मुले देखील व्यसनाधीन झालेले असतात परंतु गरिबांच्या मुली रस्त्याने जाताना नाकाकडे बघून चालतात आपल्या चारित्र्याला जिवापाड जपतात. आपल्या वर्तनातून आपल्या आई वडिलांचे नाव बदनाम होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतात. आपण खूप प्रतिष्ठित असल्याचा श्रीमंतांना भास झालेला असतो. खरे इज्जतवान श्रीमंत नसून गोरगरीब असतात. इज्जतीने वागणे हे गोरगरिबांना चांगल्या प्रकारे जमते म्हणून श्रीमंतांनी आपण खूप प्रतिष्ठित असल्याचा भ्रम डोक्यातून काढून टाकावा. तुम्ही स्वतःला कितीही प्रतिष्ठित समजत असाल तर लोक तुम्हाला खरंच किंमत देतील याची शाश्वती देऊ शकत नाही. कारण इथे वस्तुस्थिती वेगळी आहे. इथे श्रीमंतांपेक्षा गोरगरिबांना सामाजिक प्रतिष्ठा व किंमत आहे... म्हणून श्रीमंतांनी आपल्यातला अहंपणा बाजूला काढून गोरगरीब जनतेचा आदर्श घेऊन आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवावी असे मला वाटते...
0 Comments