पारदर्शक व निर्भय मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सज्ज रहा
- सीमा होळकर
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने गुरुवारी दि.27 नोव्हें. रोजी नामसंकीर्तन सभागृह, पंढरपूर येथे दुसरे सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर,सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ही राष्ट्रीय जबाबदारी निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
द्वितीय प्रशिक्षणासाठी केंद्राध्यक्ष ११०, मतदान अधिकारी ३३०, मतदान कर्मचारी ८६ व नप कर्मचारी ४५ अशा एकूण ५७१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यात आली. प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रिया व कायदेशीर तरतुदी, मतदानाच्या दिवशी पार पाडावयाच्या सर्व कायदेशीर बाबी, मतदानाची गोपनीयता आणि करावयाची कार्यवाही यावर पीपीटी आणि व्हिडिओद्वारे दाखवून माहिती दिली. तसेच, ईव्हीएम सीलिंग व हाताळणी, मतदान यंत्रे सील करण्याची तांत्रिक पद्धत व त्यावेळी घेण्याच्या दक्षतेवर मार्गदर्शन केले.
हँड्स-ऑन ट्रेनिंग अर्थात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओज दाखवून आणि ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया अत्यंत अचूकपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षित केले जात असल्याचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

0 Comments