विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी शिक्षण संस्था आणि औद्योगिक समुहांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज - हर्षवर्धन पाटील
पीसीईटी आणि टाटा मोटर्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल यांच्या मध्ये सामंजस्य करार
पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त)केंद्र सरकारने २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक समूहांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि टाटा मोटर्स लि. (टीएमएल), टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल लि. (टीएमपीव्हीएल) यांच्या मधील सामंजस्य करारामुळे पीसीईटी शैक्षणिक समुहातील संस्थांमधील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील कौशल्य विकासास चालना मिळेल, असे प्रतिपादन पीसीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयूचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पीसीईटी आणि टीएमएल तसेच टीएमपीव्हीएल यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. पीसीईटीच्या वतीने हर्षवर्धन पाटील, डॉ. गिरीश देसाई तर टीएमएल आणि टीएमपीव्हीएल यांच्या वतीने नीरज अगरवाल, अनुराग छारिया, आदिती गुप्ता, विवेक बिंद्रा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीईटी प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, टाटा मोटर्सचे कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिट प्लांट हेड अनुराग छारिया, टीएमपीव्हीएल प्लांट हेड नीरज अग्रवाल, कॉर्पोरेट फंक्शन्सचे लर्निंग अँड डेव्हलपमेंट हेड मार्सेल फर्नांडिस, टीएमएलच्या एचआर प्रमुख अदिती गुप्ता, मानव संसाधन महाव्यवस्थापक विवेक बिंद्रा, अर्ली करिअर्स अँड कॅम्पस प्रोग्राम कॉर्पोरेट फंक्शन्स प्रमुख राजीव रंजन, कौशल्य विकास प्रमुख सुशील वारंग, कौशल्य विकास प्रमुख शशिकांत रोडे, कर्मचारी संबंध प्रमुख संतोष बडे आदी उपस्थित होते.
टीएमएल आणि टीएमपीव्हीएल यांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. या सामंजस्य करारामुळे टीएमएल आणि टीएमपीव्हीएलच्या पात्र प्रशिक्षणार्थी उमेदवार, प्रशिक्षणार्थींसाठी मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील डिप्लोमा प्रोग्रामची रचना, वितरण आणि व्यवस्थापन सहकार्य करण्यात येईल, ज्यामध्ये व्यावहारिक ज्ञान, औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगारक्षमता यावर लक्ष केंद्रित केले जाईल. हा सामंजस्य करार कौशल्य विकास आणि दर्जेदार शिक्षणाच्या क्षेत्रात पीसीईटी, टीएमएल आणि टीएमपीव्हीएल यांच्यातील दीर्घकालीन सहकार्य होईल असे अनुराग छारिया म्हणाले.
डॉ. गिरीश देसाई म्हणाले की, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील हा डिप्लोमा कार्यक्रम बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी (कोणत्याही प्रवाहात) तीन वर्षांसाठी आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांसाठी आहे. हा क्रेडिट आधारित सेमिस्टर नुसार कार्यक्रम आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची सर्व वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. मूल्यवर्धित अभ्यासक्रम, क्षमता वर्धित अभ्यासक्रम आणि बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम. प्रत्येक विद्यार्थ्याला ईआरपी आणि एलएमएस प्रदान केले जातील. आवश्यक शैक्षणिक क्रेडिट्स यशस्वीरित्या मिळवल्यानंतर, पिंपरी चिंचवड विद्यापीठाकडून डिप्लोमा प्रदान केला जाईल. हे क्रेडिट्स त्यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी) मध्ये जमा केले जातील. या कार्यक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध उद्योगांसाठी कुशल कामगारांच्या स्वरूपात एक चांगला स्रोत निर्माण होईल. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी देखील निवड करू शकतात. डिसेंबरमध्ये या शैक्षणिक सत्रास प्रारंभ होईल असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार असून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. पर्यायाने औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळ मिळू शकेल. त्यामुळे विकसित भारताचा पाया अधिक भक्कम होईल असे नीरज अगरवाल म्हणाले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. उमेश पोतदार तर किशोर मालोकर यांनी आभार मानले.
.jpg)
.jpg)
0 Comments