अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५७० कोटींचा फटका
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा मंगळवेढा तालुक्यात जुलै ते सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जमिनीला वाफसा आला नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात मंगळवेढ्यात होणारी मालदांडी ज्वारीची पेरणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे ज्वारीतून मिळणारे अंदाजे ५७० कोटींचे उत्पन्न येणार नाही. ज्वारीच्या कोठारात यावर्षी पहिल्यांदाच ३० हजारांहून अधिक हेक्टरवर हरभरा व करडईची पेरणी होईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
ज्वारीच्या कोठारात ४० ते ५० फुटांपर्यंत खोलवर काळी माती असल्याने पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता अधिक आहे. त्या ठिकाणी उष्ण व कोरडे हवामान असल्याने ज्वारीची प्रत देखील दर्जेदार आहे. मंगळवेढा तालुक्यातील मालदांडी ज्वारीत ग्लुटेनचे प्रमाण अधिक असल्याने भाकरी खायला चवदार लागते. मधुमेही रुग्ण देखील या ज्वारीची भाकरी खाऊ शकतात. मालदांडी ज्वारीपासून केलेली भाकरी अनेक तासांनंतरही ना कडक ना नरम होते. रासायनिक खत न टाकता नैसर्गिकरीत्या येणाऱ्या मालदांडी या सेंद्रिय ज्वारीला २०१६ मध्ये 'जीआय' मानांकन मिळाले आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे पेरणीअभावी ज्वारीच्या कोठारातच ज्वारीचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. त्यामुळे मालदांडी ज्वारीचे भाव आगामी काळात वाढलेले दिसतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दुभत्या जनावरांसाठी कडबा लाभदायक, पण...
मंगळवेढा तालुक्यातील मालदांडी ज्वारीला 'काळ्या मातीतील हिरा' असेही संबोधले जाते. ज्वारीच्या कडब्याची ताटे जनावरांसाठी चारा म्हणून वापरतात. दुभती जनावरे चारा म्हणून तो कडबा आवडीने खातात. त्यातून दूध उत्पादनातही वाढ होते, असे अनुभव पशुपालक सांगतात. एका कडब्याच्या पेंडीला किमान २५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळतो. पण, ज्वारीची पेरणी होऊ न शकल्याने कडब्यातून शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न यंदा मिळणार नाही.
0 Comments