Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी- प्रांताधिकारी सचिन इथापे

 अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावीप्रांताधिकारी सचिन इथापे




 

पंढरपूर,(कटूसत्य वृत्त):- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. अतिवृष्टीमुळे  शहरातील व शहरात येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. येणाऱ्या वारकरी भाविकांना तसेच नागरिकांना वाहतुकीबाबतची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पंढरपूर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामे करावीत अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.                                   

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत प्रांताधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे, मदन जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.धोत्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, नायब तहसिलदार बालाजी पुलवाढ, वैभव बुचके, मंदीर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत  तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख  उपस्थित होते.

 

  यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून, यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें. असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी योग्य नियोजन करावे,  यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता व पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे, धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथकाची नेमणूक करावी. वाहनतळाची स्वच्छता व पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.राष्ट्रीय महामार्ग अन्न औषध प्रशासन विभागाने खाद्य पदार्थ तसेच प्रसादाच्या दुकानाची वेळोवेळी तपासणी करावी.

 

    आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टर,फिरते वैद्यकीय पथक, मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. मंदिर समितीने दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. दर्शनरांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी .  राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वाखरी ते पंढरपूर रस्त्यांची अपूर्ण काम तात्काळ पुर्ण करावीत. जलसंपदा विभागाने  चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी लक्षात घेवून भाविकांच्या सुरक्षेसाठी होडी वाहतुकी नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. कार्तिकी यात्रा कालावधीत जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने जनावरांना व पशुपालकांना सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. भक्ती सागर (65 एकर) येथील जागेची स्वच्छता करुन वीज, पाणी आदी व्यवस्थेची उपलब्धता करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी यावेळी  दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments