"पिकं वाहून गेली, कर्ज डोक्यावर; विवंचनेत दोन शेतकऱ्यांचा जीवनप्रवास संपला"
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : मुसळधार पावसाने सोलापूर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. नद्या-नाले, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. शेकडो गावे जलमय झाली असून हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. शेतीपिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या छायेतूनच बार्शी तालुक्यातील दोन गावांमध्ये एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या असून, संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
दहिटणे गावातील घटना – लक्ष्मण गवसाने यांची आत्महत्या
बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील लक्ष्मण काशिनाथ गवसाने (वय 58) हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या दीड एकर कोरडवाहू शेतीत सलग पावसामुळे पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय ते शारीरिक आजाराने त्रस्त होते. मानसिक तणावामुळे ते गप्प राहू लागले होते. 23 सप्टेंबर रोजी दुपारी "बाजारात जातो" असे सांगून घरातून बाहेर पडले; परंतु ते परतलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी सकाळी गावातील शेतात त्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. या घटनेने गवसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कारी गावातील घटना – शरद गंभीर यांचा मृत्यू
दुसरी घटना कारी गावात घडली. येथील शेतकरी शरद भागवत गंभीर (वय 45) यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती. त्यांनी पेरू आणि लिंबूची बाग घेतली होती. मात्र, सलग मुसळधार पावसामुळे ही बाग पाण्याखाली जाऊन पूर्णपणे नष्ट झाली. गंभीर यांच्यावर बँकेचे सात लाख आणि गावातील लोकांचे सुमारे तीन लाख असे एकूण दहा लाख रुपयांचे कर्ज होते. उत्पन्नाची कोणतीही शक्यता नसल्याने आणि कर्जफेडीची प्रचंड विवंचना असल्याने त्यांनी गायीच्या दावणाची दोरी गळ्यात घालून आत्महत्या केली.
पोलिस तपास आणि स्थानिकांची मागणी
दोन्ही घटनांची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यू (AD) म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
0 Comments