सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
पंचनाम्यासाठी पाणी ओसरण्याची प्रतीक्षा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी १० सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील १३ महसुली मंडलांमध्ये खरीप पिकांसह ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्यांचे आदेश जिल्हा प्रशासनाने तत्काळ दिले असले, तरी शेतांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे व चिखलामुळे प्रत्यक्ष पंचनाम्यांना विलंब होत आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी पुन्हा झालेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तसेच शेतशिवारात पाणी साचल्याने महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागांचे कर्मचारी बाधित भागात पोहचू शकले नाहीत.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नुकसानभरपाईसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी निसर्गाची अडथळा अजूनही प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.
पावसाचे थैमान थांबल्यानंतरच पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्णत्वास नेली जाईल. दरम्यान, शेतांमध्ये अजूनही पाणी असून, काही भागांत चिखलामुळे जाणे अशक्य झाले आहे. मात्र जिथे अडचणी नाहीत अशा ठिकाणी पंचनाम्यांची सुरुवात झाली आहे.
पाऊस थांबल्यास कामाला वेग येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितले. तर जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले म्हणाले, की संयुक्त पंचनाम्यांचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अजूनही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. रस्त्यांची स्थितीही खराब आहे. त्यामुळे कर्मचारी शिवारात पोचू शकलेले नाहीत. पाऊस थांबून पाणी ओसरेल, तेव्हाच पंचनाम्यांना गती मिळेल, असे सांगितले.
0 Comments