स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच थेऊर येथील भिल्ल समाजाला जातीचे दाखले मिळाले.
थेऊर ( प्रविण शेंडगे ) : (कटूसत्य वृत्त):- श्रीक्षेत्र थेऊर येथे, गेली ५० वर्षापूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या, भिल्ल समाजाला प्रदीर्घ काळानंतर, अखेर जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत. हा समाज गेली अनेक वर्षांपासून थेऊर येथे मासेमारी व ढोल पथकाचा व्यवसाय करीत आहे. हा समाज दाखले उपलब्ध होण्यासाठी, गेली अनेक वर्ष झगडत होता, परंतु अखेर थेऊर ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व माजी सदस्य विनोद माळी यांच्या अथक प्रयत्नातून व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्याने, अखेर १०० भिल्ल कुटुंबांना, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत.
हवेलीच्या तहसीलदार सौ. तृप्ती कोलते पाटील व हवेलीचे उपविभागीय अधिकारी श्री. यशवंत माने यांचे, पारंपरिक वाद्य वाजवून स्वागत करत, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेही उपस्थित राहणार होते. परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. यावेळी नायगाव येथीलही १०० भिल्ल समाजातील कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या मिळालेल्या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील येणारी पिढी ही, चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन, सुशिक्षित होईल. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही, या समाजातील कुटुंबांना मिळण्यास मदत होणार आहे. असे आरोग्यदूत युवराज काकडे यांनी सांगितले.
यावेळी थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव, थेऊरगाव महसूल अधिकारी सौ. सरला पाटील, महसूल विभागाचे इतर अधिकारी तसेच अरुण संभाजी धारवाड, अमित धुळे, प्रशांत खांडे, सुरज सोनवणे, संग्राम गावडे, विशाल पवार, जयदीप दिवेकर, प्रकाश म्हस्के, दिपक शितोळे, रामदास बर्डे, गोवर्धन धारवाड, लहू पवार, सलीम शेख व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रिंट व डिजिटल मिडिया हवेली अध्यक्ष संदीप बोडके व सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले.
मिळालेल्या जातीच्या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून, आभार मानले.
0 Comments