नवरात्र महोत्सव निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीचे राजस लोभस रूप पाहण्यास भाविकांची गर्दी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात होत आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे तिस-या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस श्री. तुळजाभवानी पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
रूक्मिणी मातेस मण्यां मोत्याच्या पाटल्या,सोन्या मोत्याचे तानवड जोड, सूर्य, मोठी नथ, कर्णफुले जोड, पुतळ्यांची माळ, पैंजण जोड, रूळ जोड, मस्त्य जोड, मोत्याचा तुरा, मोत्याचे मंगळसूत्र, पेठ्याची बिंदी, सरी लहान, खड्याची वेणी, चिंचपेटी हिरवी, ठुशी, जडावाचा हार, नवरत्नाचा हार, मोत्याचा कंठा इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच श्री विठ्ठलास सोन्याचे मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठ्या जोड, हिऱ्याचे कंगण जोड, शिरपेच १० लोलक असलेला, तोडे जोड, एकदाणी, हायकोल, शाळीग्राम हार, जवेची माल २ पदरी, पैंजण जोड, बोरमाळ मोठी ३ पदरी, मोत्याचा तुरा इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच राधिका मातेस सिद्धेस्वर टोप, जवमनी पदक, चिंचपेटी तांबडी, जवेची माळ, पुतळ्यांची माळ व सत्यभामादेवीला नक्षी टोप, हायकोल जवेची माल, मोहराची माळ, लक्ष्मीहार इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आला आहे. श्रीस परिधान करण्यात येणारे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत. या अलंकाराचे ‘मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजित।’ यांसारख्या अनेक अभंगांतून संतांनी वर्णन केलेले आहे.
नवरात्र महोत्सवानिमित्त श्री विठ्ठलास नऊ दिवस पोषाखावेळी अलंकार व रूक्मिणीमातेस विविध प्रकारचे पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात येत असल्याने, भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सन्मानिय सदस्य यांचे मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवातील सर्व प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.
0 Comments