सिटूच्या पुढाकारातून ५०२ कामगारांना संसारोपयोगी साहित्य संचाचे वाटप
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून पात्र नोंदणीकृत कामगारांना लाभ देण्यात येतात. या मंडळासाठी राज्यातील बांधकामांवर आकारल्या जाणाऱ्या १ टक्का सेसद्वारे हजारो कोटींचा निधी जमा होतो. या निधीचा विनियोग फक्त कामगारांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ कामगार नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी व्यक्त केले. दिवाळीसारख्या राष्ट्रीय सणानिमित्त बांधकाम कामगारांना २५ हजार रुपयांचा बोनस द्यावा, अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली.
मंगळवार, दि. २३ सप्टेंबर रोजी लाल बावटा बांधकाम कामगार युनियन (सिटू) तर्फे ५०२ बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिटूच्या नेत्या व माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांनी भूषविले. यावेळी लोकप्रिय नगरसेविका कॉ. कामिनीताई आडम, माकपचे कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. शंकर म्हेत्रे, प्रा. अब्राहम कुमार, कॉ. अमित मंचले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना कॉ. आडम मास्तर म्हणाले –
“स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात कामगारांनी रक्तरंजित संघर्ष करून कायदे अस्तित्वात आणले. मात्र २०१४ नंतर मोदी सरकारने ४४ कामगार कायदे चार श्रमसंहितेत गुंफून कामगारांच्या हक्कांवर गदा आणली आहे. कारखानदार व कॉर्पोरेट कंपन्या कामगारांचे शोषण करत असून सरकार त्यांना पाठबळ देत आहे. याला उत्तर म्हणून ९ जुलै २०२५ रोजी देशभरातील २५ कोटी कामगारांनी सार्वत्रिक संप करून कामगारविरोधी धोरणांचा निषेध केला.”
ते पुढे म्हणाले की, बांधकाम क्षेत्र अत्यंत धोकादायक असून सामाजिक सुरक्षा हमखास मिळायला हवी. मुंबईत २००८ मध्ये घडलेल्या कामगाराच्या अपघातानंतर त्यांनी या प्रश्नाची दखल घेऊन विधानसभेत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापनेचा प्रस्ताव मांडला होता. अखेर २०१० मध्ये मंडळ अस्तित्वात आले.
यावेळी त्यांनी आरोग्य सुविधेत वाढ करून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, किमान १० हजार रुपयांचे निवृत्ती वेतन, तसेच नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
मुसळधार पावसातही हजारो बांधकाम कामगारांनी एकाही क्षणासाठी जागा न सोडता कार्यक्रमात हजेरी लावली.
मार्गदर्शन करताना माकपचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ मेजर शेख यांनी –
“कामगार योजनांमध्ये सुरू असलेली दलाली तातडीने थांबली पाहिजे. खरे लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी बांधकाम कामगारांची एकजूट हीच काळाची गरज आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक मा. अयाज शेख, लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक मारेप्पा फांदिलोलू, ॲड. अनिल वासम, कॉ. श्रीनिवास म्हेत्रे, संजू बॉस जंगडेकर, मार्तंड अण्णा शिंगारे, मोनेश घंटे, आनंद तीपलदिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक कॉ. मारेप्पा फांदिलोलू यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. अनिल वासम यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशासाठी अजय भंडारे, सिमोन पोगुल, गौतम जगले, विकास कमलापुरे, रवि भंडारे, टायसन जगले, प्रमोद कुरकल्ली, सुरेश फरड, सुनील काडे, इमॅन्युएल सातालोलू, सनी भंडारे, विजयकुमार भंडारे, टोनी जगले, जेम्स तीपलदिनी, पिंटू भंडारी, सिद्राम साखरे, अक्षय भंडारे, महेश भंडारे, छोटू म्हेत्रे, आकाश शिंगारे, विल्सन जगले आदींनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments