पारधी समाजाच्या उन्नतीसाठी शासकीय योजना घरपोच
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पहाट’ उपक्रमांतर्गत मौजे बादलकोट येथे ‘ऑपरेशन पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पारधी समाजातील नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
या उपक्रमात जातीचे दाखले, आधारकार्ड, रेशनकार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. कृषी विभागाच्या विविध शेतीविषयक योजना, आदिवासी विकास महामंडळाच्या बिरसा मुंडा योजना व घरकुल योजना यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड व त्यासाठीची कार्यपद्धती, शिक्षण विभागामार्फत शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके याबाबतही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमानंतर पारधी वस्तीतील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मौजे बादलकोट येथील पारधी समाजातील महिला-पुरुष, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय मंडल अधिकारी राजेंद्र वाघमारे, शिक्षण विभागाचे दशरथ मोरे, वैद्यकीय अधिकारी पूजा पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments