साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन् बजाज शोरूमला भीषण आग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होटगी रोडवरील सिद्धी सुझुकी शोरूम व बजाज शोरूमला रविवारी (ता. १४) भीषण आग लागून त्यात अंदाजे ३५ ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. रविवारी शोरूम बंद होते. आतून धूर येऊ लागल्यानंतर वॉचमनने तत्काळ मॅनेजरला त्याची माहिती दिली आणि अग्निशामक विभागाला कळविले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास बजाज शोरूममधून धूर येऊ लागला. आतून धूर येत असल्याचे पाहून वॉचमनने लगेच व्यवस्थापकास (मॅनेजर) संपर्क साधून आग लागल्याचे सांगितले. त्यांनी तातडीने अग्निशामक विभागाला १०१ क्रमांकावरून घटनेची माहिती दिली. काही वेळातच अग्निशामकचे बंब घटनास्थळी पोचले. तोपर्यंत आग पसरत जाऊन जवळील सिद्धी सुझुकी शोरूममध्येही शिरली आणि तेथील साहित्य आगीत भस्मसात झाले.
अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी आग विझविण्याचे काम सुरू केले. पण, आगीत आठ दुचाकी वाहने, मशिनरी, वर्कशॉपमधील साहित्य जळून खाक झाले होते. या शोरूममध्ये असलेल्या ऑइलमुळे आग जास्त भडकल्याचे अग्निशामकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीच्या उंच ज्वालामुळे धुराचे लोट आकाशात पसरले होते. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. आग कशामुळे लागली, नुकसान किती झाले, याची नेमकी माहिती समजू शकली नाही.
अग्निशमन दलाने एकूण आठ बंब पाणी मारून आग आटोक्यात आणली. काही कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शोरूमवर चढले होते. त्यांनी दोन-अडीच तासांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती महापालिका अग्निशामक दलाचे प्रभारी अधीक्षक अच्युत दुधाळ यांनी दिली.
0 Comments