अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत - जिल्हाधिकारी आशीर्वाद
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी, सततचा पाऊस तसेच उजनी धरण 100% भरल्याने तसेच वीर धरणातून भीमा व सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागले त्यामुळे दोन्हीही नदीकाठच्या गावांमध्ये तसेच शेती पिकामध्ये पुराचे पाणी जाऊन झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 पासून सुरू करावेत, असे आदेश कृषी, महसूल व ग्रामविकास यंत्रणांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने अनेक लघु व मध्यम प्रकल्प भरलेले असून या प्रकल्पातूनही पाणी ओव्हर फ्लो झाल्याने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे, अशा ठिकाणचेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत. पंचनाम्यापासून एक ही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आज रात्री कृषी विभागाच्या जिल्हा, तालुका व ग्राम स्तरीय यंत्रणेची तसेच तहसीलदार प्रांताधिकारी यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेऊन त्यात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित करावेत असे आदेश त्यांनी दिले.
0 Comments