यावलीच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील यावली येथील लोकनियुक्त सरपंच वर्षा सिद्धेश्वर राऊत यांच्यावर दि. २२ जुलै रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित असलेल्या ५२५ मतदारांपैकी ४८८ मतदारांनी विरोधामध्ये मतदार केले तर केवळ ३७ मतदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. मोहोळ तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचावर जनतेतून अविश्वास ठराव मंजूर करण्याची ही पहिलीच घटना आहे.
यावली येथील सरपंच वर्षा राऊत यांची २० डिसेंबर २०२२ रोजी जनतेतून निवड झाली होती. मात्र अडीच वर्षाच्या कार्यकालात सरपंच राऊत यांनी कारभार करत असताना इतर सदस्यांना विश्वासात घेतले नाही, सरपंच पतींचा ग्रामपंचायत कारभारामध्ये हस्तक्षेप, नियमांचे उल्लंघन करून मनमानी कारभार, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष, ग्रामसभेतील निर्णयाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष या व इतर अनेक कारणांमुळे गावातील दोन्हीही गटाचे ११ सदस्यांनी दि. ११ जुलै रोजी अध्याशी अधिकारी तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर तो ठराव ११-० ने मंजूर करून तहसीलदार मुळीक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दि.१७ जुलै रोजी मोहोळचे गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांची याप्रकरणी अध्याशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार दि.२२ जुलै रोजी यावली गावामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जनतेमधून ठराव पारित करण्याच्या दृष्टीने एकूण ३१३२ मतदारांपैकी ५२५ मतदार विशेष ग्रामसभेला उपस्थित होते. हात उंचावून झालेल्या मतदानामध्ये शिर गणती नुसार ४८८ मतदारांनी सरपंचांच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर केवळ ३७ मतदारांनी अविश्वास ठरावाच्या विरोधामध्ये सरपंचाच्या बाजूने मतदान केले. या लोकनेते आणि प्रक्रियेत शासनाच्या वतीने गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, अतिरिक्त गटविकास अधिकारी विजय देशमुख, ग्रामसभेचे सचिव प्रियांका केवळे, विस्तार अधिकारी नागसेन कांबळे, विस्ताराधिकारी सचिन कदम, एस. आर. ठक्का, सुरेश साठे यांनी काम पाहिले.
दरम्यान, अविश्वास ठरावामुळे लोकनियुक्त सरपंच वर्षा राऊत यांचे पद गेले असून त्यांचा प्रभारी पदभार सहा महिन्यांसाठी उपसरपंचांकडे देण्यात येणार असून सहा महिन्यानंतर सरपंच पदासाठी जनतेतून मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यावेळी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, गोपनीय विभागाचे गोपाळ साखरे, गजानन माळी यांच्या उपस्थितीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौकट
लोकशक्ती परिवार आले एकत्र
२०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लोकशक्ती परिवाराला सहा जागा व सरपंच पद मिळाले होते, तर लोकनेते परिवाराला पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र लोकनेते परिवाराच्या उपसरपंचाला लोकनियुक्त सरपंचाने मतदान केले होते. दरम्यान, तालुक्यात विरोधी असलेल्या या
दोन्हीही गटातील सर्व ११ ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन लोकनियुक्त सरपंचांच्या विरोधामध्ये उपसरपंच जयवंत जाधव, ग्रा.पं. सदस्य शशिकांत जाधव, अभिजित दळवी, प्रमोद कारंडे, स्वाती माळी, मंगल राऊत, छाया राऊत, शहाजहान मणेरी, कालींदा चेंडगे, शैला जगताप, उषा गरड यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी मतदान केले.
0 Comments