नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडेंना निलंबित करण्याची मागणी
पुणे (कटूसत्य वृत्त):- राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्या उद्धट वर्तनाविरुद्ध स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने बिनवडेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना नोंदणीप्रक्रियेत येणाऱ्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे होणारा नाहक त्रास व इतर मागण्यांकरिता स्वाभिमानी ब्रिगेडचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील व शिष्टमंडळ हे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांना भेटण्यासाठी गेले असता बिनवडे यांनी उद्धटपणे व अपमानास्पद वागणूक स्वाभिमानी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिली. "ऑफिसच्या बाहेर निघा, मला शिकवू नका, काय करायचं ते मला समजतं" अशी अरेरावीची आणि उर्मटपणाची भाषा बिनवडेंनी वापरल्याचा आरोप सुरवसे पाटील यांनी केला आहे.
नोंदणीप्रक्रियेत सातत्याने येणाऱ्या अडचणी, सर्व्हर डाऊन, नोंदणी महानिरीक्षकांची भेटीची वेळ मिळवण्यात होणाऱ्या त्रासाबाबत चौकशीसाठी गेलेल्या नागरिकांना एका प्रशासकीय अधिकाऱ्याने अक्षरशः अपमानित करून हाकलल्याचे घटनेने खळबळ उडाली आहे.
बिनवडेंच्या या कार्यपद्धतीविरोधात स्वाभिमानी ब्रिगेडकडून जोरदार घोषणाबाजीसह ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी ॲड.कृष्णा साठे, ॲड.सुधीर शिंदे, सचिन मोरे, तेजस गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, देवेंद्र खाटेर, सोनू आंधळे, आदित्य शेटे, आकाश नवले, सागर घाडगे, यश मोरे, बाबा मिसाळ हे उपस्थित होते.
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, नोंदणी महानिरीक्षकांचे कार्यालय हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे की विशेष लोकांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जर अशा प्रकारची वागणूक बिनवडे यांच्यासारखा अधिकारी देत असेल तर सामान्य माणूस आपले प्रश्न घेऊन गेल्यास काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा. आम्ही सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन भेटण्यासाठी गेलो असता, बिनवडे यांनी आम्हाला अक्षरशः हाकलून लावले. आवाज चढवत ऑफिसमधून बाहेर व्हा असे उद्धटपणे बोलले. म्हणून आज आम्ही ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदवला आहे. लोकांची कामे करता येत नसतील तर अशा अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा.
लवकरच आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन रविंद्र बिनवडे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहोत; असेही सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे.
0 Comments