दुधाचे दर घसरले, उत्पादक अडचणीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

दुधाचे दर घसरले, उत्पादक अडचणीत

 दुधाचे दर घसरले, उत्पादक अडचणीत




मुंबई (कटूसत्य वृत्त):- इंदापूर तालुक्यात दूध उत्पादन हा केवळ व्यवसाय नाही, तर अनेक कुटुंबांचा श्वास आहे. गायी-भाकड जनावरांची सेवा करताना शेतकरी स्वतःच्या लेकरासारखं त्यांचं संगोपन करतो; मात्र याच दुधाला बाजारात न्याय्य दर मिळत नसेल, तर शेतकर्‍यांच्या कष्टांना अर्थ उरत नाही.

मागील काही दिवसांपासून दूध दरात टप्प्याटप्प्याने घसरण सुरू असून, यामुळे पशुपालक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अवकाळी पावसाने आधीच दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम केला होता. त्यानंतर आता दूध पावडर आणि बटरच्या दरात घसरण झाल्याने 25 मेपासून दूध संकलन दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे.

इंदापूर तालुका हा राज्यात दूध उत्पादनाच्या आघाडीवर आहे. सोनाई, अमूल, दूधगंगा, नेचर, गोविंद आदी प्रकल्पांमार्फत दैनिक लाखो लिटर दूध संकलन होत असले तरी याचा लाभ शेतकर्‍याच्या पदरात कितपत पडतो, हा खरा प्रश्न आहे. सध्या 3. 5 फॅट आणि 8. 5 एसएनएफ असलेल्या दुधाला फक्त 32 रुपये प्रति लिटर दर दिला जात आहे. पूर्वी याच दुधाला 34 रुपये दर मिळत होता.

ही केवळ आकड्यांची घसरण नसून शेतकर्‍याच्या तुटत चाललेल्या अपेक्षांची कहाणी आहे. गाईला वेळेवर चारा, पाणी, औषधं, औषधपाणी, झुल देणं, भाकड काळातही सांभाळणं – हे सगळं शेतकरी आईच्या मायेसारखं करत असतो. पण जेव्हा त्याच दुधाला बाजारात नफा देण्याऐवजी तोटा मिळतो, तेव्हा हतबलतेची किनार दूध उत्पादकांच्या बोलण्यात दिसते. शेतकरी आज दर कपातीवर बोलतोय, पण उद्या हा व्यवसाय सोडून देण्याच्या विचारात असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची? गावागावात जनावरं आहेत, पण त्यांचे रक्षण करणारे शेतकरी जर आर्थिकदृष्ट्या टिकले नाहीत, तर ही साखळी तुटेल आणि तेव्हा उशीर झालेला असेल.

आशेची वाट… की तोट्याचा व्यवहार?
शेतीच्या अस्थिर उत्पन्नामुळे अनेक तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळण घेतले. काहींनी कर्ज काढून मुक्त गोठे उभारले, महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडला. गावोगाव 'दुधात पैसे आहेत' असं म्हणून ही वाट चालायला सुरुवात केली. गाईच्या संगोपनासाठी महिन्याला 15 ते 17 हजार रुपये खर्च येतो – चारा, पशुखाद्य, औषधं, मजुरी, वीज इ. त्यामानाने उत्पन्न फक्त 10 ते 12 हजार रुपयेच.

बाजारभावाचा घसरता आलेख
मे महिन्यात पावसाच्या आगमनामुळे आइस्क्रीम, दही, ताक यांची मागणी कमी झाली. परिणामी, दूध प्रकल्पांमध्ये साठा वाढला. त्याचा थेट परिणाम दूध पावडर आणि बटरच्या दरावर झाला
दूध पावडर – प्रतिकिलो दरात 30 घसरण
बटर – प्रतिकिलो दरात 20 घसरण
यामुळे प्रकल्पांनी दर कपात केली असून, पुढे आणखी कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही बाजाराची प्रतिक्रिया असली, तरी परिणाम फक्त आणि फक्त शेतकर्‍याच्या ताटात दिसतो.

सरकार कुठे आहे?
शेतकर्‍यांनी शासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत
दूधाला हमीभाव जाहीर करावा
पशुखाद्यावर अनुदान मिळावे
साठवणूक करणार्‍या प्रकल्पांना मदत द्यावी
बाजार हस्तक्षेप योजना राबवावी
याशिवाय, दूध उत्पादन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार आहे, हे लक्षात घेऊन दीर्घकालीन योजना राबवण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages