नातेपुते विकास आराखड्याच्या हरकतींचा सर्वांसमक्ष तोडगा काढावा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या अनुषंगाने टाकलेल्या आरक्षणाबाबत नगरवासियांकडून आलेल्या हरकतींचा नगरवासीय व लोकप्रतिनिधी या सर्वांसमक्ष तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे सोलापूर येथील नगर रचना सहाय्यक संचालक कल्याण जाधव यांच्याकडे माळशिरस तालुका शिवसेना नेते राजकुमार हिवरकर पाटील यांनी केली आहे.
नातेपुते नगरपंचायत हद्दीत प्रारूप विकास आराखड्याचे आरक्षण टाकल्यामुळे काही कुटुंब भूमिहीन होणार आहेत.पिढीजात कसत असलेल्या जमिनी असून ग्रामपंचायत काळापासून यावर केलेली घरे, बांधकामे, दवाखाने यावरती आहेत. विकास नगररचनेच्या नकाशात दाखवलेले रस्ते यासह विविध प्रयोजने यामुळे नागरिकांच्या उदरनिर्वाहाच्या जागा, घरे, शेतजमिनी, असलेली बांधकामे यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रारूप विकास आराखड्याच्या अनुषंगाने ११० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. नातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीतील जवळपास २६ गटांचा आरक्षणाशी संबंध येत आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपंचायतीला विकासासाठी निधी दिला आहे. विकास कामाबरोबरच नागरिकांच्या उदरनिर्वाहाच्या जागा, घरे, जमिनीच्या प्रश्नाबाबत नोंदविलेल्या हरकतीवर सुनावणी घ्यावी. सुनावणीस स्वतः उपस्थित राहून नगरवासीय व लोकप्रतिनिधी यांच्यासमोर तोडगा काढावा अशा मागणीचे निवेदन राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिले आहे.
0 Comments