Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यापीठातील १४.८२ कोटींचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे स्मारक अपूर्णच!

 विद्यापीठातील १४.८२ कोटींचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे स्मारक अपूर्णच!




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर १४ कोटी ८२ लाख रुपये खर्च करून राजमाता अहिल्यादेवींचे भव्य स्मारक साकारले जात आहे. दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर आता नवीन मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे.   तरीदेखील, स्मारकाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. जानेवारीअखेर स्मारकाचे काम पूर्ण होईल, यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा पाठपुरावा सुरू आहे.
सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामांतर झाले. त्यानंतर विद्यापीठात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानुसार राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली आणि १४ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी दिला. तत्पूर्वी, २३ ऑगस्ट २०२१ रोजी स्मारक उभारणीसाठी समिती नेमण्याचा निर्णय झाला. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०२३ रोजी स्मारक समिती स्थापन झाली आणि शासन आदेशानुसार पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर ३१ मे २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन झाले आणि स्मारकाच्या लोकार्पणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलावण्याचेही नियोजन ठरले होते. पण, वेळेत हे काम पूर्ण झाले नाही आणि लोकार्पण सोहळा लांबला. आता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आगामी जयंतीपूर्वी स्मारकाचे काम पूर्ण होईल, यादृष्टीने कुलगुरूंचे नियोजन आहे.
जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मोठे स्मारक उभारले जात आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, बैठका देखील घेतल्या जात आहेत. कामासाठी डिसेंबरपर्यंत मुदत आहे, पण जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल.
- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

स्मारकाची राहणार ही वैशिष्ट्ये...

विद्यापीठाच्या नव्या परीक्षा भवन व प्रशासकीय इमारतीसमोर हाती पिंड घेतलेला अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा

स्मारकाभोवती चौथरा, बारवाची (अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरीप्रमाणे) उभारणी

स्मारकाभोवती उभारल्या जाणाऱ्या शिल्पसृष्टीतून समजणार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे समाजकार्य स्मारकाजवळ गार्डन, कारंजे उभारणी; स्मारक पाहायला येणाऱ्यांची असणार भव्य बैठक व्यवस्था.
मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकामागे उभारला जाणार १५७ फुटाचा वॉच टॉवर ३००व्या जयंतीदिनीच स्मारकाचे लोकार्पण राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३००वी जयंती साजरी होत आहे. तत्पूर्वी, विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांना आणण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments