थंडीचा जोर ओसरणार, राज्यातलं वातावरण पुन्हा बिघडलं
ढगाळ हवामानासह तापमानात चढउतार शक्य
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील थंडीचा जोर कमी झाल्यानंतर पावसाला पोषक हवामान होत आहे. काल रविवार (दि.२२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ९ अंश तापमान नोंदले गेले.
सोमवार (दि.२३) अंशतः ढगाळ हवामानासह राज्याच्या किमान तापमानातील चढ- उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पूर्व- मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली उद्यापर्यंत (दि.२४) उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे.
रविवारी (दि. २२) पंजाबच्या 'लुधियाना' येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली आहे. धुळे वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान १० अंशांच्या वर गेले आहे.
पहाटेच्या वेळी धुक्याची चादर आणि दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच रविवारी (दि. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.३ अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामान दिसून येत असून, महिनाअखेर पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे.
0 Comments