विमान उड्डाणाचा मुहूर्त समीप; तिकीट विक्रीकडे सोलापूरकरांचे लक्ष
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होटगी रोड येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आला होता. मात्र अद्यापही या मार्गावरील तिकीट बुकिंग सुरू झाली नाही.
उड्डाणाचा मुहूर्त जवळ आल्याने प्रवाशांना तिकीट बुकिंग सरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.
सोलापूर येथील होटगी रोड विमानतळाचे अधिकृत उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने केले होते. त्यानंतर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणूक काळात सोलापूर दौऱ्यावर असताना २३ डिसेंबरपासून सोलापूर- मुंबई व सोलापूर-गोवा या मार्गावर नागरी विमान वाहतूक सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.
विमानसेवेचा प्रारंभ होण्याचा मुहूर्त अवघ्या १४ दिवसांवर येऊन ठेपला तरीही अद्याप या दोन्ही मार्गाचे तिकीट बुकिंग सुरू झालेले नाही. गोवा किंवा मुंबई येथे प्रवास करणाऱ्यांना किमान पंधरा दिवस अगोदर नियोजन करणे आवश्यक आहे.
मात्र विमानसेवा सुरू होण्याचा दिवस जवळ येऊन अजूनही तिकीट विक्री सुरू नसल्याने प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इंधनाचा प्रश्न शिल्लकच
सोलापूर विमानतळावर सध्या विमानात इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. आजपर्यंत ये-जा करणारी विमाने सोलापूरला येतानाच इंधन भरून येत असत. आता गोव्याहून सोलापूरला विमान येणार असून तेच विमान मुंबईला जाणार आहे.
अशा परिस्थिती गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई या प्रवासात लागणारे इंधन गोव्यातून भरून येणे आवश्यक आहे. या इंधनामुळे विमानाच्या वजनात वाढ होऊ शकते.
जास्त इंधन बाळगण्याचा परिणाम प्रवासी क्षमतेवर होणार आहे. पर्यायाने याचा परिणाम तिकीट दरावरही होऊ शकतो. यामुळे सोलापूर विमानतळावर इंधन भरण्याची सुविधा होणेही गरजेचे आहे.
चार्टर्ड सेवा मात्र सुरळीत
नागरी विमानसेवा सुरू नसली तरी राजकीय नेत्यांची व खासगी दौऱ्यासाठी येणारी चार्टर्ड विमानांची ये-जा मात्र सुरू आहे.
रविवारी (ता.८) अमेरिकेतील उद्योजक मुंबई येथून चार्टड विमान घेऊन सोलापूरला येऊन गेले. मागील सहा महिन्यांपासून अमेरिकेच्या मियामी शहरातून अल्बर्ट व ब्रॅंडोन हे उद्योजक सोलापुरात येण्याचा विचार करत होते.
चिंचोळी एमआयडीसी बंग डाटा उद्योजकांचे अमेरिकेतील ते ग्राहक आहेत. ते अमेरिकेहून मुंबई येथे उतरून चार्टर्ड विमानाने रविवारी सोलापुरात पोचले. दिवसभर आपले काम आटोपून परत मुंबईला पोचले. बंग डाटाचे वासुदेव बंग यांनी होटगी रोडवरील विमानसेवा सुरू झाल्याबद्दल सोलापूर विकास मंचच्या सदस्याचे आभार मानले.
फ्लाय- ९१ कंपनी गप्पच
गोवा- सोलापूर व सोलापूर मुंबई या मार्गावर गोवास्थित फ्लाय-९१ ही कंपनी सेवा देणार आहे. सोलापूरला विमानसेवा सुरू होण्याची अधिकृत घोषणा व संभाव्य तिकिटाच्या दाराची माहितीही या कंपनीने यापूर्वीच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
मात्र, या कंपनीच्या संकेतस्थळावरील तिकीट बुकिंगच्या जागेवर अद्याप सोलापूरचा पर्याय देण्यात आलेला नाही. तिकीट विक्री नेमकी कधी सुरू होणार याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता नेमका दिवस सांगता येत नाही. मात्र, लवकरच तशी घोषणा करण्यात येईल, असे सांगितले जाते. तिकीट विक्रीचा मुहूर्त मात्र सांगितला जात नाही.
- अंजली शर्मा, साहाय्यक सरव्यवस्थापक, सोलापूर विमानतळ
0 Comments