Hot Posts

6/recent/ticker-posts

मोदींच्या उपस्थितीत 5 तारखेला शपथविधी सोहळा पण CM पदाचं नाव अजूनही गुलदस्त्यात

 मोदींच्या उपस्थितीत 5 तारखेला शपथविधी सोहळा पण CM पदाचं नाव अजूनही गुलदस्त्यात





मुंबई (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. अशातच आता राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठे यश मिळालं. मात्र, महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नव्हता. आता 5 तारखेला शपथविधी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठ दिवस उलटले तरीही सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा संपता संपत नाही, अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाल्याची माहिती दिली. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदानवर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती बावनुकळेंनी एक्स अकाऊंटवर दिली.

5 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील नवीन सरकारच्या शपथविधीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, अशा सूचना बावनकुळेंनी दिल्यात.

या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 235 जागा जिंकल्या आहेत. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा जिंकल्या, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. भाजप महायुतीत मोठा पक्ष ठरल्याने मुख्ममंत्रीपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे.

15 ते 16 हजार पासची व्यवस्था

तसेच प्रत्येक जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यावेळी आझाद मैदानात ज्यांना सुरक्षेच्या कारणास्तव पास देण्यात आला आहे, त्यांनाच प्रवेश दिला जाईल. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष पासची सुविधा उपलब्ध असणार आहे. सुमारे 15,000 ते 16,000 पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार?
एकीकडे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत असताना आता नवा फॉर्म्युला समोर आला. सुरूवातीचं एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली. या माहितीला भाजपने दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्यात नेतृत्वात निवडणूक लढवली गेली. मतदारांनी त्यांना कौल दिल्याने एकनाथ शिंदे हे एक वर्ष मुख्यमंत्री राहतील, अशी भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. जनमताचा अनादर होऊ नये, यासाठी भाजपचे काही ज्येष्ठ नेते ही भूमिका घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments