हातरस आणि क्रिकेटमधील उन्माद एकच - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 17, 2024

हातरस आणि क्रिकेटमधील उन्माद एकच

 हातरस आणि क्रिकेटमधील उन्माद एकच

***********


    हातरस येथे भोंदू भोले बाबाच्या सत्संगामध्ये त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचे बळी गेले. या भोंदू बाबाचे अनेक आयएएस ,आयपीएस अधिकारी, राज्यकर्ते अंधभक्त आहेत .त्यामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होऊनही भोंदू बाबा वर साधा गुन्हाही दाखल झाला नाही.  भोंदू बाबा मृत्युमुखी पडलेल्या भक्तांच्या कुटुंबीयांना सांत्वनासाठी भेटला नाही. हा नीचपण आहे परंतु भक्तांच्या दृष्टीने मोक्ष आहे. इतके होऊनही अंधभक्त सुधारण्याची शक्यता नाही.

    मागील वर्षी सरकार पुरस्कृत मनूवादी महाराजाला महाराष्ट्र भूषण दिला व त्यांच्या आग्रहाखातर भर उन्हात लाखोंच्या गर्दीत कार्यक्रम घेतला .त्यात अनेकांचा जीव गेला .परंतु जे मेले ते मोक्षाला प्राप्त झाले अशा प्रकारचे विकृत विचार मांडले गेले .सरकारने  कोणती कारवाई केली ना कुणाला अटक.  आपल्या देशात स्वप्नाचे सौदागर व मृत्यूचे दलाल यांची चलती आहे .

  काल मुंबई येथे विश्वकप जिंकून आलेल्या क्रिकेट खेळाडूंची अतिभव्य मिरवणूक काढून वानखेडे स्टेडियम येथे करोडो रुपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला .यात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते .  श्वास कोंडून व गर्दीमुळे  अनेक जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे .थोडेसे इकडे तिकडे झाले असते तर हातरस  सारखे मृत्यूकांड मुंबईत घडले असते. या मिरवणुकीनंतर 15 ते 20 टन चपला व बाटल्यांचा कचरा महापालिकेने जमा केला. यावरून या गर्दीचा अंदाज येऊ शकतो.

 हातरस आणि मुंबईचा विषय वेगळा असला तरी गर्दीचा उन्माद  एकच आहे. भारतात खेळामध्ये सुद्धा वर्णव्यवस्था असून सर्वोच्च वर्ण म्हणून क्रिकेटला मान्यता आहे. इतर खेळाडूंना व खेळांना त्यामानाने सन्मान नाही ,हे वास्तव आहे. खेळाडूंनी विजय मिळवला त्यांचे अभिनंदन करणे एवढ्यापर्यंत ठीक आहे. परंतु साऱ्या देशाला वेठीस धरून इतका शासनपुरस्कृत उन्माद करणे व लाखोंची गर्दी जमा करून जनतेस वेठीस धरणे कितपत बरोबर आहे .जे तरुण या गर्दीत जमत आहेत ते स्वतःच्या रोजगारासाठी, हक्क अधिकारासाठी, अन्याय झाला त्यावेळी ,विविध परीक्षेतील पेपर फुटले त्यावेळी रस्त्यावर का येत नाहीत .हा मूलभूत प्रश्न आहे.

    देशाचे प्रधानमंत्री क्रिकेट खेळाडूंसाठी खास वेळ देऊन भेटतात. ते पराभूत झाले तर त्यांच्या गळ्यात पडून रडतात .हे देशाने बघितले आहे. परंतु देशासाठी ऑलिम्पिक पदक आणणाऱ्या  महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार झाले, त्यांनी आपली पदक पंतप्रधानांच्या घरासमोर टाकली ,तरीही पंतप्रधान त्याकडे ढुंकून बघत नाहीत. क्रिकेट खेळाडू वरील त्यांचे प्रेम व इतर खेळाडू बद्दल तिरस्कार हा खेळातील वर्णव्यवस्थेचाच नमुना आहे .

 क्रिकेट हा भांडवलदारांचा खेळ झाला असून सट्टेबाजार ,आयपीएल ,खेळाडूंची खरेदी विक्री ,मॅच फिक्सिंग यांनी बरबटलेला आहे .करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल या खेळातून होत असते . त्याचे लाभार्थी वेगळे आहेत .तीन लाकडं आणि अकरा माकड जेव्हा मैदानावर असतात तेव्हा शंभर कोटी लोक आपले कामधाम सोडून उपाशीपोटी हा तमाशा बघत असतात. खेळाडूंचा सन्मान करण्याला विरोध नाही परंतु त्याला काही मर्यादा असण्याची आवश्यकता आहे. धार्मिक ,सामाजिक, राजकीय व कुठल्याही क्षेत्रातील उन्माद लोकशाही व मानवतेसाठी घातकच आहे.

@ गंगाधर बनबरे 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages