Hot Posts

6/recent/ticker-posts

 

आम्ही तुमच्यासोबत, 50 गाड्यांचा ताफा घेऊन अजित पवारांचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला




सोलापूर (कटूसत्य वृत्त);- जालना: लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरला आहे. मराठवाड्यातील राजकारणाचं चित्रच बदलण्याचं काम मराठा आरक्षण आंदोलनानंतर झाल्याचं दिसून येत आहे.

मराठवाड्यातील 8 पैकी 7 खासदार मराठा समाजाचे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, बीड आणि जालना मतदारसंघातील विजय राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. विजयी झालेले काही खासदार मनोज जरांगेंची भेट घेऊन आभार मानत आहेत. त्यातच, आज अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा शब्दही त्यांनी जरांगेंना दिला. त्यामुळे, पाटील यांच्या या भेटीची चर्चा जोर धरत आहे.

लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडेंचा पराभव करुन विजय मिळवला. तर, अंतरवाली सराटी गाव ज्या जिल्ह्यात येतं त्या जालना मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, वस्तुस्थिती तीच आहे, की मनोज जरांगे इम्पॅक्ट यंदाच्या निवडणुकीत दिसून आला आहे. स्वत: परभणी आणि बीडमधील महाविकास आघाडीच्या उमेवारांनी मनोज जरांगेंमुळेच आपला विजय झाल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांची चर्चा आत्ताच सुरू झाली आहे.

जालन्यातील अंतरवली सराटी येथे अजित पवार गटाचे अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. 50 गाड्यांच्या ताफ्यासह शेकडो कार्कर्त्यांना घेऊन ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. यावेळी, आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी भावनाही आमदार पाटील यांनी बोलून दाखवली. त्यामुळे, जरांगे यांच्या भेटीचा नेमका उद्देश काय, नेतेमंडळी जरांगेंच्या भेटीसाठी का येत आहेत, याची चर्चा मराठवाड्यात रंगली आहे. मात्र, मराठवाड्यातील काही मराठा खासदारांच्या विजयात जरांगे फॅक्टरचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, अंतरवाली सराटी जरांगे यांच्या भेटीसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांकडून ही जरांगे पाटील यांचा शाल टोपी घालून सत्कार करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments