भाजपा ४० हजार कोटीची रस्ते मतदारांना दाखविणार का?
मोहोळ तालुक्याचा विकास मोदींनी केल्याचा सातपुतेंचा अजब दावा
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात मोहोळ तालुक्यात विकासाची गंगा आणून ४० हजार कोटीचे रस्ते केल्याचा अजब व धक्कादायक दावा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी केला. मोहोळ येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना राम सातपुते यांनी हा दावा केला. (असा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे.) यावेळी आ.यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील हेही उपस्थित होते. त्यामुळे मतदार संघातील मतदार आश्चर्य व्यक्त करू लागला आहे. भाजपा ४० हजार कोटीची रस्ते मतदारांना दाखविणार का? असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात मोहोळ तालुक्याला १ फुटकी कवडी दिली नाही. उलट भाजपाने या तालुक्याला सतत सापत्न वागणूक दिलेली आहे. असे आजही कॉग्रेसचे नेते सांगत आहेत. ३० वर्षापासून मोहोळ तालुक्यावर कधीच भाजपाचा किंवा शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून या तालुक्याचा विकास थंडावला होता. मध्यंतरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विद्यमान आ.यशवंत माने यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि गेल्या सहा महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपाला साथ देण्याचे ठरवले इतकेच...
मोहोळ तालुक्यामध्ये निधी खेचून आणणारा एकही भाजपाचा नेता नाही उलट भाजपाने या तालुक्याला सतत सापत्न वागणूक दिली. हे वास्तव असताना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मोहोळ तालुक्यात भाजपाने विकासाची गंगा आणली आणि चाळीस हजार कोटीचे रस्ते केले असे वक्तव्य चक्क आजी-माजी आमदारसमोर समोरच केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. जर मोहोळ तालुक्यात भाजपाने ४० हजार कोटीचे रस्ते केले असतील तर ते गेले कुठे...? जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात जशी विहीर चोरीला गेली हे दाखवले त्याप्रमाणे मोहोळ तालुक्यातील रस्ते चोरीला गेले की काय असा प्रश्न घेऊन उद्या नागरिक पोलीस स्टेशनमध्ये गेले तर कोणी आश्चर्य व्यक्त करू नये. असो रस्ते चोरीला गेले नसतील तर मग ४०,००० कोटी निधी कुठे गेला हा ही प्रश्न पुढे येतो.
का निवडणुकीपुरता हा जुमला आहे? कागदी घोडे नाचून कागदावर रस्ते दाखवले असतील का? असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही. विद्यमान आ.यशवंत माने यांनी आजवर रस्त्यासाठी किंवा मोहोळ तालुक्यासाठी आणलेला विकास निधी भाजपानेच आणलाय का? या प्रश्नाचे उत्तर विद्यमान आमदार यशवंत माने देतील का...? महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यात चाळीस हजार कोटीचा निधी रस्त्यासाठी दिला असा दावा केल्याने आजी-माजी आमदारांची गोची झाली.
मोहोळ मतदार संघासाठी विकासगंगा भाजपाने आणली असेल तर भाजपाच्या नेत्यांनी आजवर हे कधीच माध्यमांसमोर किंवा जनतेसमोर का बरं सांगितलं नाही..हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ निवडणुका लागल्यानंतर किंवा मतांची गोळा बेरीज करण्यासाठी अशा प्रकारचा सूर सातपुते अळवत असावेत का? निवडणुका लागण्याच्या अगोदर भाजपाच्या एकाही नेत्याने किंवा विद्यमान आ.यशवंत माने यांनी सुद्धा मोहोळ तालुक्यात चाळीस हजार कोटीचे रस्ते झाले आहेत असं कधीच विधान केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम सातपुते यांना असे वक्तव्य का करावा वाटलं. जर राम सातपुतेंचं वक्तव्य सत्य असेल तर त्यांनी चाळीस हजार कोटीचे रस्ते कुठे...? कोणते....? कशा पद्धतीने केले हे तपशीलवार सिद्ध केलं पाहिजे अशी मागणी सध्या मतदार संघातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
केवळ निवडणूक जिंकण्यासाठी अशा प्रकारचा खोटा प्रचार सातपुते करीत असतील का...?
विद्यमान आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांना सातपुते यांनी भाजपाने मोहोळ तालुक्यात विकास गंगा आणली हे मान्य आहे का...? असेल तर या दोन्हीही आजी-माजी आमदारांनी जनतेसमोर किंवा माध्यमांसमोर येऊन आपलं मत प्रकट करणे गरजेचे आहे. परंतु हे दोन्ही आमदार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसल्यामुळे खरंच मोहोळ तालुक्यात रस्त्यासाठी ४० हजार कोटी आलेत असं मतदारांनी समजायचं का...?
सतत जय श्रीराम आणि हिंदुत्व याचा नारा देणारे महायुतीचे उमेदवार राम सातपुते मोहोळ मतदार संघात हिंदुत्वावर न बोलता विकास गंगेवर का बोलले याचाही उलगडा...सातपुते करतील का....? असा प्रश्न सध्या नागरिकांमधून विचारला जातोय.
0 Comments