टेंभुर्णी वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे सलग तीन वेळा ऊस जळून चार लाखाचे नुकसान
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे माढा तालुक्यातील उजनी (टें) येथील शेतकऱ्याचे तीन वेळा ऊस जळून अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून या अन्यायाविरोधात टेंभुर्णी वीज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा परमेश्वर मेटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, उजनी (टें) ता.माढा येथील शेतकरी परमेश्वर तुकाराम मेटे यांच्या शेताच्या बांधा शेजारी असलेल्या विद्युत पोल वरील तारा व मेटे यांच्या गट नंबर 41/01 येथील मेटे वस्ती रोहीत्राजवळील एल टी लाईन (पूर्वे बाजू) खांबाच्या विद्युत वाहिनीच्या तारेमध्ये पार्किंग होऊन ठिणग्या पडून ऊस जळीत होत आहे.असा प्रकार आतापर्यंत तीन वेळा होऊन ऊस जळून गेला आहे.तसेच त्याबरोबर ऊसामध्ये टाकलेली ड्रीप जळून खाक झाल्याने अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत याच ऊस जळीत कारणावरून परमेश्वर तुकाराम मेटे यांनी टेंभुर्णी वीज कार्यालयासमोर 01/ 01 /2018 रोजी उपोषण केले होते. त्या अगोदर 30/04/2016 रोजी व 14/01/2017 रोजी असे दोन वेळा याच विद्युत खांबाच्या विद्युत वहिनीच्या तारेची पार्किंग झाल्यामुळे ऊसामध्ये ठिणग्या पडल्याने ऊस जळाला होता. त्यामुळे आम्ही उपोषण धरले होते.त्या वेळेस वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या शेतातील विद्युत पोल शिफ्ट करून देतो असे आश्वासन दिले होते.मात्र पाच वर्षे झाली तरी पोल शिफ्ट केले नाहीत.तर पुन्हा दि.14/01/2024 रोजी विद्युत वहिनीच्या ताराच्या पार्किंग होऊन तिसऱ्यांदा ऊस जळाला आहे. त्याबाबत ही टेंभुर्णी येथील वीज मंडळाला दि .15/01/2024 रोजी लेखी अर्ज देऊन सुद्धा माझी कुठलीही दखल घेतली नाही.यामुळे मला माझ्या शेतातील ऊस व ड्रीप जळाल्याचे नुकसान भरपाई मिळावी व माझ्या शेतातील गट नंबर 41/01 मेटे वस्ती वरील पोल शिफ्ट करावा या मागणीसाठी टेंभुर्णी वीज मंडळाच्या समोर दि .12 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला करणार असल्याचा इशारा मेटे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता बार्शी, सोलापूर, बारामती, तसेच टेंभुर्णी, व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिला आहे.

0 Comments