Ads

Ads Area

सोलापूर शहरात दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण

 सोलापूर शहरात दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण


सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर करण्याबाबत सुचित केलेले आहे. त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.  जिल्हाधिकारी कार्यालयात शिवगर्जना महानाट्य आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, पोलीस शहर उपायुक्त अशोक तोडरमल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गवारे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता भारत व्हनमाने, शिक्षणाधिकारी माध्यमिक मारुती फडके, तहसीलदार विनायक मगर, शिवगर्जना महानाट्याचे निर्माता दिग्दर्शक स्वप्निल यादव, शकील पटेल यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

           छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य जिल्ह्यातील नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचावे. या महानाट्य ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित संस्था यांनी चांगला समन्वय ठेवावा. तसेच ह्या महानाट्यची  जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करावी. दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2024 यादरम्यान कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये. महानाट्यदरम्यान पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

            प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी शिवगर्जना महानाट्य हे दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सुरू होणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव हे महानाट्य दिनांक 10 ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे याची सर्व संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी असे सुचित केले. हे महानाट्य हरीभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या कालावधीत होणार असून यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. तसेच महानाट्य यशस्वी होण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग,  विभाग शालेय शिक्षण विभाग, माहिती विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असेही त्यांनी सुचित केले.

             शिवगर्जना महानाट्य हरिभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात तीन दिवस सादर केले जाणार असून सायंकाळी 6.30 ते रात्री 10 पर्यंत हे नाट्य सुरू राहणार आहे. यामध्ये जवळपास अडीचशे कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांना महानाट्यदरम्यान प्रत्यक्ष हत्ती, घोडे, आदी पाहता येणार आहेत. या महानाटयचे देशभरात 93 प्रयोग करण्यात आलेले असून अलीकडेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी शिवगर्जना महानाट्य पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.  प्रवेश विनामूल्य आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close