गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांचेकडे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांची मागणी
पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांना गेल्या चार पाच दिवसात गारपीट आणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे यामध्ये पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होवून शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेवून केली आहे. यावेळी संचालक मोहन नागटिळक उपस्थित होते.
शनिवारी पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर कासेगांव, मुंढेवाडी , पिराचीकुरोली, देवडे, शेवते या भागात अवकाळी गारपीट झाली आहे. यामध्ये द्राक्ष, पपई, डाळींब, आंबा, केळी यासह गहु, मका, हरभरा या शेतीपिकांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी तात्काळ शासनस्तरावरुन मदत मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंती काळे यांनी लेखी निवेदनाद्वारे पवार यांची भेट घेवून केली आहे. पवार यांनीही तात्काळ दखल घेत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करुन एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. अशी माहिती चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली.
0 Comments