अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम हाती घ्यावी - पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत दिले निर्देश
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):– अंमली पदार्थ सेवन व त्याचे दुष्परिणाम, त्याबाबतचे कायदे यासंदर्भात जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम हाती घ्यावी. यातून भावी पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यापासून सुरक्षित राहील, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे यांनी आज येथे केले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन कार्मिक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिन कांबळे, कृषि विभागाचे तंत्र अधिकारी सी. बी. मंगरूळे, टपाल विभागाचे एम. आर. पल्लेवाड आदिंसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, जिल्हा तसेच तालुका पातळीवर आढळणाऱ्या अंमली पदार्थाचे सेवन व वापर, तसेच अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच त्या संदर्भात येणाऱ्या समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे समिती सदस्यांनी तालुके दत्तक देऊन संबंधित तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घ्यावेत.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, समिती सदस्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ उत्पादन होत नसल्याबद्दल दक्ष राहावे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ निर्मिती होत नाहीत, याबाबत सतर्क राहावे. कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पीक पाहणीच्या वेळी गांजा, खसखस अशा पिकांच्या लागवडीबद्दल खात्री करावी. असे प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावेत. सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कुरियर कंपन्यांच्या गोदामांची वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
0 Comments