माझ्या मुलांना डोळ्यासमोर जाताना मी पाहिलयं - मुख्यमंत्री

मुंबई (नासिकेत पानसरे):- विधानसभेत विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अश्रू अनावर झाले. माझी दोन मुलं माझ्या समोर गेली. हे सांगताना ते फारच गहिवरून गेले.त्यावेळी मला आनंद दिघे साहेबांनीच आधार दिला. मी समाजकारण राजकारण सगळ सोडणार होतो पण माझ्या पाठीशी दिघे साहेब बापासारखे उभे राहिले.
शिंदे-फडणवीस सरकारने आज विधीमंडळ सभागृहात बहुमत सिद्ध केले त्यानंतर सभागृहामध्ये त्यांचे अभिनंदन केले. या अभिनंदनानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणामध्ये आपल्या बंडाचं कारण स्पष्ट करणारं भाषण केलं.अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी बंड केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. न्यायासाठी बंड करण्याचे संस्कार आमच्यावर बाळासाहेबांनीच केले आहेत. बंडामागे हिंदुत्वाचा विचार होता. हे सगळं का झालं याची कारणं शोधली पाहिजेत. माझं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. माझा बाप काढला गेला. कुणी रेडा आणि प्रेत म्हटलं अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. सोबतच्या महिला आमदारांना वेश्या म्हटल्याचंही त्यांनी नमूद केलं.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुलं गेली तेव्हा कोसळलो होतो. दिघेंनी मला सावरलं. मी दिघेंच्या मृत्यूनंतर कोलमडलो होतो. माझ्याविरुद्ध खटले चालवले गेले. दिघेंच्या मृत्यूनंतर ठाण्यात शिवसेना संपेल अशी स्थिती होती. मी शिवसेना पुन्हा उभी केली. कुटुंबापेक्षा जास्त वेळ शिवसेनेला दिला. लेडीज बार उद्ध्वस्त केल्यामुळे लेडीज बारवाले माझ्या जीवावर उठले होते. तरीही संघर्ष सुरुच ठेवला. ठाण्यात आता सगळीकडे शिवसेना आहे. भास्करराव आम्ही गद्दार नाही असं प्रत्युत्तरही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं.
फडणवीसांनी सेनेच्या माणसाला मुख्यमंत्रीपद दिलं याबद्दल एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. माझं आणि फडणवीसांचं ट्युनिंग बरोबर जमलं आहे. मी आणि फडणवीस मिळून २०० आमदार निवडून आणू, असेही ते म्हणाले. मी आज मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, यावर विश्वास बसत नाही. सत्तेच्या पदाच्या लालसेपोटी काहीही करणार नाही. मी पूर्वीही शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. खोटं बोलून कोणत्याही माझ्या विभागात अजित पवार हस्तक्षेप करायचे. सात वाजताच ते मंत्रालयात यायचे. हस्तक्षेप होता तरीही मी तक्रार केली नाही. कारण मी कद्रू मनाचा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
बंडखोर आमदारांना रेडा म्हणणाऱ्या संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना 'कामाख्या देवीने आता कुणाचा बळी घेतला?', असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला. काँग्रेससोबत जाणार नाही, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही लढत असलेली लढाई ही वैचारिक लढाई आहे. स्वार्थाची लढाई नाही, असं त्यांनी सांगितलं.
0 Comments