Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील साडेबारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधीपक्ष नेता म्हणून अजित पवार काम करतील - जयंत पाटील

 राज्यातील साडेबारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधीपक्ष नेता म्हणून अजित पवार काम करतील - जयंत पाटील

मुंबई (नासिकेत पानसरे):- शिवसेना - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादा पवार यांनी केलेले काम हे पुढील काळात लक्षात राहिलच शिवाय राज्यातील साडेबारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून अजितदादा पवार काम करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत आज व्यक्त केला. 

अजितदादा पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर जयंत पाटील बोलत होते.अजितदादांचा स्वभाव रोखठोक आणि स्पष्ट असल्याने सभागृहातील चुकीच्या गोष्टी व शासनाकडून राहिलेल्या त्रुटींवर समर्थपणे बोट ठेवण्याचे काम अजितदादा करतील असेही जयंत पाटील म्हणाले. 

एखादा निर्णय त्वरीत घ्यायचा असताना ३०-३५ वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव उपयोगी पडेल. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पद भूषविले आहे. तसेच अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रत्येक खात्यातील बारकावे समजण्यात त्यांना यामुळे अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने विषय मांडले जात असताना अजितदादा विरोधी पक्षाची बाजू अतिशय समर्थपणे मांडतील, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

नवीन सरकार राज्यातील जनतेसाठी जे जे चांगले काम करेल त्याला अजितदादांचे सहकार्य नक्कीच लाभेल. त्याप्रमाणेच कणखर विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्षांच्यावतीने सरकारकडे मागण्या मांडण्याचे काम आणि सोबत योग्य मार्गदर्शन करण्याचे काम अजितदादा निश्चित करतील असे सांगतानाच जयंत पाटील यांनी पक्षाच्यावतीने अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. 

Reactions

Post a Comment

0 Comments