किल्ले रायगड कडे जाणाऱ्या 'खर्डी - नगर भुवन ते हिरकणी वाडी' या पर्यायी रस्त्याचे काम प्रलंबित


पुणे, (कटुसत्य वृत्त): 22 जुलै 2021 चा महाप्रलय आणि त्या दरम्यान डोंगरभागांत अनेक ठिकाणी भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या भयंकर घटना झाल्या.इतकी भयानक नैसर्गिक आपत्ती आणि त्यांत झालेली जीवित आणि वित्तहानी महाड-पोलादपूर तालुक्यांनी कधीही पहिली नव्हती.
रस्तेच वाहून गेले,मोऱ्या खचल्या परिणामी डोंगरभागांतील अनेक दुर्गम वाड्या-वस्त्या आणि गांवे यांचा संपर्क कित्येक महिने तुटला होता. अन्न-धान्य, बाजारहाट, दवाखाने इत्यादी मूलभूत सुविधा मिळेनाश्या झाल्या होता.नोकरी-व्यवसायांसाठी जाणे-येणे शहरात येणे दुरापास्त झाले होते.
त्यामुळे या दुर्गम भागांतील अश्या गावांत पोहचण्यासाठी इतर पर्यायी रस्ते असले पाहिजेत,अशी गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
हल्लीच महाड-रायगड रस्त्यावरील खर्डी फाटा ते खर्डी गांव या 2.5 किमी रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. इथून हा रस्ता पुढे घाटमार्गाने नगर भुवन या डोंगरावर असणाऱ्या गावात गेला आहे,घाटातील हे अंतर सुमारे 5 किमी आहे.रस्त्याच्या या घाटातील टप्याचे अजूनही डांबरीकरण झालेले नाहीये,तरीही या घाटारस्त्याने लहान-मोठी वाहने ये-जा करत असतात.
नगर भुवन ते नेवाळेवाडीकडे जाणारा गाडीरस्ता सध्या अस्तित्वात नाहीये. नगर भुवन ते नेवाळेवाडीच्या दिशेला जाणाऱ्या वाटेवर 1 किमी अंतरावर एक पाण्याचा आड खोदलेला आहे,तिथवर कच्चा रस्ता आहे. इथून पुढे माळरानातून नेवाळेवाडीत जाणारी पायवाट नियमित वापरात असली तरी वाहने जाऊ शकतील अशी नाहीये, हे अंतर या ठिकाणी रस्ता झाल्यास फक्त 1 किमी इतकेच भरेल. हिरकणी वाडी कडून नेवाळेवाडी कडे येणार पक्का रस्ता आहे,त्या रस्त्याचे 3 वर्षे अगोदर डांबरीकरण झालेले आहे.
थोडक्यात, 1 किलोमीटर अंतराचा नेवाळेवाडी येथील माळरानातील रस्ता खोदल्यास किल्ले रायगड आणि घेऱ्यातील गावांत जाणारा पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. खर्डी फाटा-नगर भुवन-हिरकणी वाडी हे थेट अंतर जवळपास फक्त 12 किमी असेल. पाचाड घाटापेक्षा हा पर्यायी घाट कमी उताराचा,सोप्या वळणांचा आणि सुटसुटीत असल्याने भविष्यात एसटी सारख्या मोठ्या बसेस ना सुद्धा सोयीस्कर असणार आहे.
रायगड प्राधिकरण समिती,बांधकाम विभाग महाड,वनविभाग महाड तसेच संबंधित इतर शासकीय यंत्रणा यांनी या प्रस्तावित रस्त्याचे नव्याने सर्वेक्षण करुन या मार्गाला लवकरात लवकर चालना द्यावी.
खर्डी,नगर भुवन,नेवाळेवाडी या मार्गाने पर्यटकांची ये-जा सुरू झाल्यास भविष्यात रायगडाला वाढत जाणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होईल.पर्यायी रस्त्यामुळे या दुर्गम भागातील स्थानिकांना सुद्धा रोजगार उपलब्ध होतील तसेच आपत्कालीन परिस्थितीतील मदतीसाठी हा पर्यायी रस्ता उपयोगात आणता येऊ शकेल.या रस्त्याच्या खोदाईचे काम लवकरात लवकर पूर्ण करून,भविष्यात रायगडाला जाणारा एक पर्यायी पक्का डांबरी रस्ता म्हणून हा मार्ग वापरात आणावा अशी मागणी साद सहयाद्री प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली आहे.
0 Comments