Hot Posts

6/recent/ticker-posts

पेण विधानसभा आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर लढवायचीय;असेच काम करा आणि पक्षाचा एबी फॉर्म घेऊन जा - जयंत पाटील

पेण विधानसभा आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर लढवायचीय;असेच काम करा आणि पक्षाचा एबी फॉर्म घेऊन जा - जयंत पाटील

          पेण (नासिकेत पानसरे):- पेण विधानसभा आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर लढवायची आहे. तुम्ही तुमचं काम असंच चालू ठेवा, तुमची प्रगती अशीच चांगली राहिली तर माझ्याकडून एबी फॉर्म घेऊन जा असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पेणवासियांना दिले. 

          राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आज दुसर्‍या दिवशी पेण विधानसभा मतदारसंघात असून यावेळी या मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. 

          जवळपास २०० मतदारसंघांचा दौरा पूर्ण करून आज पेण येथे पोहोचल्याचे जयंत पाटील यांनी सांगतानाच परिवारांशी संवाद साधण्यासाठी आलो. पक्षाचा कार्यकर्ता हाच पक्षाचा महत्त्वाचा घटक आहे म्हणून त्यांच्याशी हितगुज साधण्यासाठी हा दौरा आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

          संपूर्ण राज्यभरात पवारसाहेबांना मोठा मान आहे त्याप्रमाणे या जिल्ह्यातही पवारसाहेबांना लोक मोठ्याप्रमाणावर मानतात, पक्ष हा विधानसभा मतदारसंघ लढवत नसतानाही पक्ष टिकवण्याचे काम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे त्याबद्दल जयंत पाटील यांनी धन्यवाद दिले. 

          महाराष्ट्रातील जवळपास सर्व खासदारांशी माझे चांगले संबंध आहे, मात्र सुनील तटकरे हे एक झुंजार खासदार आहेत. त्यांनी हातात घेतलेले कामे पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाही. त्यामुळेच त्यांना मोठा जनाधार लाभला आहे. मतदारसंघाला न्याय देणारा खासदार निवडून दिला आहे अशा शब्दात खासदार सुनिल तटकरे यांचे जयंत पाटील यांनी कौतुक केले. 

          अदिती तटकरेंचे कामही मोठ्या चिकाटीने सुरू आहे. आपल्या जिल्ह्यातील विकास कामांसाठी झटून निधी आणण्याचे काम ती करत आहे. अदिती यांच्या कामाचा आवाका पहाता तिला कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी इच्छा होते असेही जयंत पाटील म्हणाले. 

          गेल्या २२ वर्षात आपण इथे अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवली नाही. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला मात्र २०१९ साली पेण, रोहा, श्रीवर्धन या तालुक्यांनी भरभरून मतदान केले आणि माझा विजय झाला याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे यांनी मतदारांचे आभार मानले. 

          आज पेण तालुक्यातील खारेपाटणच्या पिण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जयंत पाटील यांनी मदत करावी असेही खासदार सुनिल तटकरे म्हणाले. 

          इथला शेतकरी फार मेहनतीने काम करतो, फळभाज्या पिकवून रस्त्यावर विकतो आपल्या या लोकांचे प्रश्न सोडवायचे आहे. या तालुक्यातील २२-२३ गावांमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच आहेत. आपल्याला अधिक चांगले काम करून पक्ष इथे बळकट करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका जर वेळेवर झाल्या असत्या तर राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असते मात्र तरी कधीही निवडणूक होवोत राष्ट्रवादीच एक नंबरवर राहणार असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी दिला. 

          अष्टविनायकापैकी एक असलेल्या पाली गणपती, विनोबा भावे यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. विकासकामांना गती दिली जात आहे त्यामुळे संघटनेकडे लोक आकर्षित होत आहे. मला विश्वास आहे की इथली संघटना बळकट होईल आणि पेण विधानसभेत पुन्हा राष्ट्रवादीचा आवाज घुमेल असा विश्वास पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. 

          तालुकाध्यक्षांनी इथली परिस्थिती सांगितली. एक वेळ होता की इथे राष्ट्रवादी पक्षाची चांगली ताकद होती मात्र मधल्या काळात संघटना कमी झाली. पवारसाहेबांनी मला जिल्हा परिषदेवर संधी दिली मग मी व अनिकेत तटकरे यांनी इथल्या विकास कामांना गती दिली आहे आणि पेण-सुधागडचे प्रश्न सोडवले आणि संघटना वाढण्याची पुन्हा सुरूवात केली आहे असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. 

          सुधागड येथे सुखसुविधा उपयुक्त क्रिडा संकुल उभारले आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मंजूर झाले आहे, लवकरच कामाला सुरुवात होईल. आदिवासी बांधवांसाठी प्रशिक्षण केंद्र तयार करण्याचा आमचा मानस आहे असेही अदिती तटकरे यांनी सांगितले. 

          यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत, महिला तालुकाध्यक्षा चैताली पाटील, पेण युवक अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर, शहर महिलाध्यक्षा सुचिता चव्हाण, शहर युवक अध्यक्ष सागर हजारे, पाली तालुकाध्यक्ष रमेश साळुंखे, महिला तालुकाध्यक्षा रुपाली भणगे, युवक तालुकाध्यक्ष संदेश शेवाळे, शहराध्यक्ष अभिजित चांदोरकर, महिला शहराध्यक्षा सुजाता वडके, युवक शहराध्यक्ष आकाश दिघे, युवती शहराध्यक्षा वैभवी साखर्ळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments