मुख्यमंत्र्यांच्या एका भाषणामुळे झाला भाजपचा गेम, वाचा नेमंक काय घडलं?

कोल्हापूर,(कटूसत्य वृत्त):- उत्तर कोल्हापूर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली.
या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार आणि चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा दारूण पराभव केला आहे. जयश्री जाधव यांना 96176 मते मिळाली तर सत्यजीत कदम यांना 77426 मते मिळाली. हा निकाल म्हणजे भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यासाठी एक झटका मानला जात आहे.
या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण असं काय झालं की, जयश्री जाधव यांना लाखाच्या घरात मते मिळाली? उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेच राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्धार केला. मात्र, ही जागा शिवसेनेने काँग्रेसला सोडली.
उत्तर मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज झाले होते. नाराज झालेल्या राजेश क्षीरसागर हे दोन दिवस नॉट रिचेबलही होते. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. क्षीरसागर यांच्या घराबाहेर हजारो कार्यकर्ते जमा झाले.
त्यांनी भगवे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी केली. शक्तिप्रदर्शन केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आणि क्षीरसागर यांना आता थेट मातोश्रीवरून बोलावण्यात आले आणि त्यांची नाराजी दूर केली. मात्र, असे असले तरी राजेश क्षीरसागर आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यासोबतच शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का?
असा सवालही भाजपकडून उपस्थित केला जात होता. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसेल आणि भाजपचा विजय सोपा होईल असा अंदाज भाजपने मांडला होता. पण प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एक सभा झाली आणि सर्व चित्रच पालटलं. वाचा : उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीचा संपूर्ण निकाल मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित केलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि उद्धव ठाकरेंची ही एक सभा भाजपच्या पराभवाला हातभार लावणारी ठरली असल्याचं बोललं जात आहे. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. काल नानांच्या प्रचाराला फडणवीस येऊन गेले.
बऱ्याचदा असं होतं की, आपल्याकडे बोलण्यासाठी काही मुद्दे नसतील तर खोटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं घोडं कुठे पुढे सरकतं याकडे पहायचं ही यांची एक वाईट सवय झाली आहे. कधी-कधी असा विचार येतो की, आज राम नवमी आहे प्रभू रामचंद्रांचा अवतार झालाच नसता तर यांचं राजकारण कसं झालं असतं. कुठल्या मुद्द्यावर राजकारण केलं असतं. स्वत:च्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखं काहीच नाहीये यांच्याकडे...
मग धार्मिक मुद्दे पुढे कर, द्वेष पसरवणारे पुढे कर हे असं काही करायचं आणि आपलं इच्छित असेल ते साध्य करायचं. शिवसेना समोरून वार करते आता पोटनिवडणुकीत जयश्रीताई जाधव निवडून येणारच... कारण शिवसेना हा समोरून वार करते. पाठीमागून वार करत नाही.
आम्ही जे करतो ते समोरासमोर. होय बोललो तर खरं करुन दाखवण्यासाठी वाट्टेल ते करु. पण पाठीत वार कधी करणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही छुपं मत दिलं होतं की नव्हतं? पण 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला.
पण भाजपची 40 हजार मते जर शिवसेनेला तेव्हा मिळाली असती तर 1 लाख 10 हजार मते झाली असती. मग ती मते का नाही मिळाली. काँग्रेसची मते जी 47 हजार होती ती 91 हजार झाली म्हणजे 40 हजार मते तुम्ही फिरवली नाहीत कशावरुन? आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का?
मग गेल्यावेळी तुम्ही छुपं मत दिलं होतं की नव्हतं? याचा खुलासा कोण करणार? तुम्ही जे छुपं करता.. आम्ही देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणे करत आहोत. पाठिंबा देतो तर उघडपणाने आणि विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
0 Comments