मोहोळ तालुक्यातील तीन बालविवाह रोखले, 'चाईल्ड हेल्पलाइन' पथकाची कारवाई
.png)
दरम्यान, या तीनही अल्पवयीन मुलींना बालगृहात पाठविण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील नरखेड गावात दोन व अनगर येथे एक अशा एकूण तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह होणार असल्याची माहिती 'चाइल्ड हेल्पलाइन'ला मिळाली होती. त्यानुसार बालकल्याण समिती अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, सुवर्णा बुंदाले, प्रकाश ढेपे, महिला व बालविकास अधिकारी विजय खोमणे, 'चाइल्ड हेल्पलाइन'चे जिल्हा समन्वयक आनंद ढेपे, सदस्य स्वप्नील शेट्टी, संगीता पारशेट्टी यांचे पथक पोलिसांच्या मदतीने नरखेड येथे दाखल झाले. पथकाने दोन्ही लग्नमंडपांतील नवरी असलेल्या बालिकांकडे चौकशी केली असता, त्यांचे वय 17 वर्षे असल्याचे समोर आले. त्यामुळे पथकाने हे बालविवाह रोखले.
त्यानंतर 'चाइल्ड हेल्पलाइन'चे पथक दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अनगर येथील एका लग्नमंडपात दाखल झाले. यावेळी लग्नमंडपातील नवरी असलेल्या बालिकेकडे चौकशी केली असता, तिचे वय 17 वर्षे नऊ महिने असून, ती चिंचोली काटी येथील असल्याचे समजले.
'चाइल्ड हेल्पलाइन' पथकाने तिन्ही ठिकाणच्या बालविवाहांतील दोन्ही बाजूंच्या लोकांना ताब्यात घेऊन मोहोळ पोलीस ठाण्यात जबाब नोंदविले. तर, तिन्ही अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर केले. बालकल्याण समितीने तिन्हीही अल्पवयीन मुलींची रवानगी बालगृहात करण्याचा आदेश दिला आहे.
0 Comments