जनतेच्या तक्रारी दूर करण्यासाठी क्रीयाशील पद्धत तयार करा
निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या सूचना
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-नागरिकांच्या तक्रारी दूर करणे प्रशासनाचे काम आहे. स्थानिक पातळीवर तक्रारीचा निपटारा होणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने जनतेच्या तक्रारी दूर करण्यासाठी क्रीयाशील पद्धत तयार करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिल्या.लोकशाही दिनात श्रीमती पवार बोलत होत्या. यावेळी सामान्य शाखेच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी उपस्थित होत्या.श्रीमती पवार यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने लोकशाही दिनाच्या तक्रारीवर लक्ष केंद्रीत करावे. तक्रारींची वेळेत दखल घेऊन त्या प्राधान्याने सोडवाव्यात. आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचाही वेळेत निपटारा करावा. पोर्टलवरील प्रकरणे 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रलंबित ठेवू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.धर्माजी नामदेव शिंदे (रा. खंडाळी, ता माळशिरस) यांच्या अर्जाची आज सुनावणी घेण्यात आली. त्यांना खंडाळीतील 508 गट नंबर दत्तनगर येथे हवा आहे. याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाने आठ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीमती पवार यांनी दिल्या.आपले सरकार पोर्टलवर 59 तक्रारी प्रलंबित असून त्यांचा संबंधित विभागाने त्वरित निपटारा करावा. आज लोकशाही दिनात 9 नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून अर्ज सादर केले तर 19 अर्ज टपालात आले आहेत. सर्व अर्ज संबंधित विभागाला पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीमती कुलकर्णी यांनी दिली.
0 Comments