काँग्रेसच्या काळातच बँक घोटाळा; निर्मला सीतारामन यांचा दावा
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- देशात नीरव मोदी व विजय मल्ल्या यांच्यापेक्षा मोठा बॅंक घोटाळा गुजरात मध्ये उघडकीला आला असून यावरून मोदी सरकारवर चौफेर आरोप होत आहेत. एबीजी शिपर्याड कंपनीचा हा घोटाळा असून त्यात तब्बल २२ हजार ८०० कोटी रूपयांची रक्कम अडकली आहे. तथापि या संबंधात पत्रकारांशी बोलताना आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या घोटाळ्याचे खापरही तत्कालिन युपीए सरकारवरच फोडले आहे. युपीए सरकारच्या काळातच या कंपनीचे खाते एनपीए मध्ये म्हणजे बुडित कर्जात गेले होते असे त्यांनी म्हटले आहे. हा घोटाळा बॅंकेने तत्परतेने उघडकीला आणला त्याबद्दल त्यांनी संबंधीत बॅंक अधिकाऱ्यांचेही कौतुक केले. मोदी सरकारच्या काळातच बॅंकांचे आर्थिक आरोग्य चांगले सुधारले असल्याचा दावाहीं त्यांनी केला. तथापि या घोटाळ्याविषयी नोव्हेंबर २०१८ आणि ऑगस्ट २०२० मध्येच स्टेट बॅंकेने सीबीआयकडे तक्रार नोंदवून त्यांना गुन्हा नोंदवण्याची विनंती केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाले आणि अखेर ७ फेब्रुवारी २०२२ मध्ये सीबीआयने त्या संबंधात गुन्हा दाखल केला आहे. हा इतका विलंब कसा झाला असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला होता. त्यावर अर्थमंत्र्यांकडून काही खुलासा यावेळी झाला नाही. यातील आरोपी मोदींबरोबर कोरियाच्या दौऱ्यावर गेला होता असा आरोपही कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे त्यावरही निर्मला सीतारामन यांच्याकडून या पत्रकार परिषदेत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
0 Comments