वाहतुकीच्या नियमासंदर्भात सजगता हवी - सहा.पोलीस निरीक्षक नागेश यमगर सांगोला विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन
सांगोला (कटूसत्य वृत्त):- रस्त्यावरील अपघात प्रामुख्याने निष्काळजीपणामुळे आणि बेभान वर्तनामुळे तसेच विनापरवाना वाहने हाताळल्यामुळे होताना आढळतात. या व्यक्ती स्वतःबरोबरच इतर व्यक्ती तसेच समाजातील इतर घटकांवरही दुष्परिणाम करताना दिसतात. तारुण्यावस्थेमध्ये आलेल्या मुलांसह त्यांच्या पालकांना व वाहन चालवणार्या प्रत्येकाला वाहतुकीचे नियम व वाहतुकीचे कायदे याची माहिती झाली पाहिजे. त्यांच्यामध्ये वाहतुकीच्या नियमा संदर्भात सजगता निर्माण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केले सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन या कार्यक्रमांमध्ये सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर सांगोला पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती ॲड राजेश्वरी केदार, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभीषण माने, लायन्स क्लब सांगोला अध्यक्ष प्रा.ला. धनाजी चव्हाण उपस्थित होते. पुढे बोलताना यमगर साहेब म्हणाले वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास विद्यार्थ्यांबरोबर पालकांना व वापरण्यात आलेल्या गाडीच्या मालकाला शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाहनांचा वापर योग्य पद्धतीने करावा असे सांगत सांगोला परिसरातील झालेल्या अपघातांची संख्या,मृतांची संख्या, जखमींची संख्या यांची आकडेवारी सांगत जाणीव जागृती केली. तसेच शाळा कॉलेजमध्ये मुलींची छेडछाड व इतर गुन्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा अंतर्गत शिक्षेची मोठी तरतूद आहे असे सांगत विद्यार्थ्यांना या कायद्यासंदर्भात मौलिक माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी केले सूत्रसंचालन प्रा. माधुरी पैलवान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. नवनाथ बंडगर यांनी केले.
विद्यार्थ्यांनी सार्वजनिक संकेतस्थळासाठी आपल्या कडील चांगल्या ज्ञानाचा चांगला वापर केला तर फायदा होईल. सार्वजनिक संकेतस्थळाचा चुकीचा वापरकर्ता सायबरच्या नियमाप्रमाणे शिक्षेस पात्र आहे. तसेच शारीरिक, शाब्दिक, चित्रफितीने केलेली छेडछाड लैंगिक अत्याचारच आहे. त्या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासंदर्भात सजग रहावे
*ॲड राजेश्वरी केदार*
महिला दक्षता समिती
सांगोला पोलीस स्टेशन
0 Comments