आता मी रिटायर, पुढचा नेता प्रणितीच- सुशीलकुमार शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आमदार ते केंद्रीय गृहमंत्रिपदापर्यंत मजल मारणारे सुशीलकुमार शिंदे यांनी अनेकदा संघर्षकाळ अनुभवला. संघर्षातूनच त्यांना यश मिळत असतानाच त्यांच्याभोवती पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गराडाही वाढला. त्यांच्याच जोरावर महापालिकेत कॉंग्रेसला सत्ता मिळाली. मात्र 2014 च्या मोदी लाटेनंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर आता मी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत रिटायर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांच्याभोवतीचा गराडा कमी झाला आणि त्याची प्रचिती सोमवारी (ता. 27) झालेल्या कॉंग्रेस भवनातील बैठकीवेळी आली.
माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत म्हटल्यावर तासन्तास त्यांची रेल्वे स्थानकावर वाट पाहणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आता तेवढ्या प्रमाणात पाहायला मिळत नाहीत. शहर- ग्रामीणमधील अनेकांना त्यांनी राजकारणात विविध पदांवर संधी दिली. तरीही, अनेकांनी त्यांची साथ सोडली. कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या राजकीय वाटचालीत शिंदे यांचे योगदान मोठे असल्याचे बोलले जाते. तरीही, त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे सवेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती 'घड्याळ' बांधले. एवढेच नाही, तर आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत असतानाच खरटमल यांनी कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांसह काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना धक्का दिला. कॉंग्रेस भवन असो वा सुशीलकुमार शिंदे किंवा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील कोणत्याही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणारे पदाधिकारीच या बैठकीत दिसले नाहीत. दरम्यान, आता मी रिटायर झालो असून पुढचा नेता आमदार प्रणिती शिंदे याच असतील, असेही शिंदे यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले. बैठकीवेळी अनुपस्थित माजी महापौरांची चर्चा कॉंग्रेसने आतापर्यंत अनेकांना महापौरपदी संधी दिली, परंतु त्यांनीही आता आपल्याला ज्यांच्यामुळे संधी मिळाली, त्यांचा हात सोडल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसमधील नाराजांवर आता भाजपसोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांनी वॉच ठेवायला सुरवात केली आहे. दरम्यान, सोमवारी कॉंग्रेस भवनातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला माजी महापौर ऍड. यू. एन. बेरिया, आरिफ शेख, सुशीला आबुटे, संजय हेमगड्डी, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, नगरसेविका फिरदोस पटेल यांच्यासह अनेकजण गैरहजर राहिले. हे माजी पदाधिकारी या बैठकीला का उपस्थित राहू शकले नाहीत, हे अस्पष्ट आहे. परंतु त्यातील काहींनी विविध कारणे पुढे करून कामानिमित्त येता आले नाही, असे स्पष्ट केले. तर शहराध्यक्ष प्रकाश वाले हे परगावी असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, असेही सांगण्यात आले.
0 Comments