जगन्नाथ भोईटे यांच्या विचाराचा वारसा या पंचक्रोशीत कायम राहणार- रामदास झोळ
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावचे देशभक्त स्वर्गीय जगन्नाथ कृष्णा भोईटे (गुरुजी) यांनी स्वतंत्रपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचार या पंचक्रोशीत रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तोच पुरोगामी विचारांचा वारसा या पंचक्रोशीत कायम राहणार असल्याचे प्रतिपादन भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक रामदास (बप्पा) झोळ यांनी केले.
कै. जगन्नाथ कृष्णा भोईटे यांच्या पुण्यतिथी निमित्त भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, जे.के. फाऊंडेशन व ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या संयुक्त विद्यमाने शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
याप्रसंगी रामदास झोळ हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ बापू झोळ हे होते. प्रारंभी कै.जगन्नाथ भोईटे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.
रामदास झोळ पुढे बोलताना म्हणाले की, जगन्नाथ भोईटे यांनी या पंचक्रोशीत अनेक शाळा काढण्याचा व चालविण्याचा प्रयत्न केला असून ते जनतेच्या अडीअडचणींना धावून जात होते. सध्या कोरोनाच्या लाटेमुळे ही रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. म्हणूनच संस्थेचे हितचिंतक असलेले व सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेणारे अमोल भोईटे यांनी आपल्या शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपल्या शाळेचा व संस्थेचा लौकिक वाढवला असल्याचे झोळ यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ बापू झोळ म्हणाले की, देशात कोरोना या रोगाने जनतेला त्रस्त करून टाकलेले असून अनेक रुग्ण रक्त मिळत नसल्याने दगावत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी रक्ताचीच गरज लागते. ही गरज ओळखून वाशिंबेकरानी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. तरी गावच्या जास्तीत जास्त तरुणाने रक्तदान करून गावाचे नाव सामाजिक क्षेत्रात उंचावर घेऊन जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. रक्तदान हेच श्रेष्ठदान असे सांगून सध्याच्या संकट काळात हीच खरी देशांची सेवा आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नसल्याची भावनाही शेवटी झोळ यांनी व्यक्त केली.
या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद तरूणवर्ग ग्रामस्थांनी दिला. १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अक्षय ब्लड बँक सोलापूर यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वाशिंबे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ. मनीषाताई नवनाथ झोळ, विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ, भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार साळुंके, सचिव विजय दादा साळुंके, विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश यादव, सहशिक्षक मारूती जाधव, नवनाथ पवार, पत्रकार सचिन भोईटे, अजित झोळ, अनिल झोळ, अशोक वाघमोडे, बाळा पवार, अंकुश यादव, सागर भोईटे, महादेव भोईटे, महादेव (बाबा) झोळ यांच्यासह ग्रामस्थ व युवक मित्रपरीवार उपस्थित होता. सूत्रसंचालन सहशिक्षक हरी शिंदे यांनी केले. तर आभार जे.के. फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल भोईटे यांनी मानले.
दत्तकला तरूण मंङळ यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.
1 Comments
देशभक्त स्व .भोईटे गुरुजींना विनम्र अभिवादन आणि सर्व वाशिंबेकर रक्तदात्यांचे मनःपुर्वक अभिनंदन .
ReplyDelete