Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यात १०० बेडचे कोविड हॉस्पिटल तात्काळ कार्यरत करावे - अ‍ॅड.श्रीरंग लाळे

 मोहोळ तालुक्यात १०० बेडचे कोविड हॉस्पिटल तात्काळ कार्यरत करावे - अ‍ॅड.श्रीरंग लाळे

          मोहोळ (कटुसत्य वृत्त): करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ही मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. विषाणू संसर्गाचा वेग अधिक आहे त्यामुळे मोहोळ तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अश्या परिस्थितीत संभाव्य धोका लक्षात घेऊन मोहोळ तालुक्यासाठी १०० बेडचे कोविड उपचार रुग्णालय मंजूर करून ते तात्काळ कार्यरत करणे गरजेचे आहे अशी मागणी अँड. श्रीरंग लाळे यांनी केली.

          पंढरपूर येथे १५० बेडचे कोविड रुग्णालय मंजूर आहे. सोलापूर येथे जिल्हा रुग्णालयात करोना बाधित रुग्णांवर उपचार होतात. इतर तालुक्यातही कोविड बाधित रुग्णांवर उपचार होतात मग मोहोळ तालुक्यासाठी असा दुजाभाव का ? मोहोळ तालुक्यातील जनता कायम आरोग्यकर देते तर मग त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे ऑक्सिजन व इतर योग्य त्या सोयीसुविधा असणारे १०० बेडचे कोविड रुग्णालय कार्यरत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे अ‍ॅड.श्रीरंग लाळे यांनी सांगितले.

          मोहोळ तालुका हा तब्बल १०४ गावांचा तालुका असून त्याचा विस्तार मोठा आहे. सोलापूर शहरात असणाऱ्या सरकारी रुग्णालयात शहरातील आणि ग्रामीण असा रुग्णांचा मोठा ताण असल्याने तिथे मोहोळच्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. मोहोळ तालुक्यात विलगीकरण कक्ष असून कोविड रुग्णांवर उपचार करणारे सरकारी रुग्णालय नाही. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या अधिक असल्याने मोहोळच्या रुग्णांना बेड मिळण्यास असंख्य अडचणी येत आहेत त्यामुळे कोविड बाधित रुग्णांची हेळसांड होत आहे. खाजगी रुग्णालयात गेल्यास लाखो रुपयांचे रुग्णलयांचे बिल भरणे सर्वसामान्य जनतेला शक्य नाही. त्यामुळे अनेक बाधित रुग्ण घरीच बसून जीवाशी खेळ करत उपचार घेत आहेत; ही बाब गंभीर असून मोहोळच्या रुग्णांच्या जीवाशी खेळ कुठपर्यंत होत राहणार(?) असा संतप्त सवाल अ‍ॅड.श्रीरंग लाळे यांनी प्रशासनाच्या समोर मांडला आहे.अ‍ॅड.श्रीरंग लाळे स्वतः करोना बाधित होऊन विलगीकरणात असल्याने सदरच्या मागणीचे निवेदन त्यांनी ई-मेल द्वारे मा. मुख्यमंत्री व मा.आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हाधिकारी,मा. प्रांताधिकारी,पंढरपूर व तहसिलदार, मोहोळ यांना पाठविलेले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments