Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई (कटूसत्य वृत्त): क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विनम्र अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांचे विचार, कार्यकर्तृत्व आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ही मुल्ये रुजविण्यासाठी आयुष्य वेचले. अनिष्ट रुढी-प्रथामुक्त आणि शोषणमुक्त समाजाचा आग्रह धरला. स्त्री-शिक्षणासह विविध सामाजिक सुधारणांसाठी क्रांतीकारी पावले उचलतानाच महात्मा फुले यांनी शेती-सिंचन, औद्योगिक आणि पायाभूत विकास क्षेत्रातही कृतीशील योगदानाचा आदर्श उभा केला. त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊया. सत्यशोधक, थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’’

 “क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मांधतेसारख्या अनिष्ठ चाली-रितींविरुद्ध विचारांचा लढा पुकारला. बहुजनांच्या दु:खाचं, दारिद्र्याचं, मानसिक गुलामगिरीचं मूळ ‘अविद्ये’त असल्याचं सांगत त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. देशाला पुढे नेणारा, देशात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवणारा सत्यशोधक विचार त्यांनी दिला. महात्मा जोतिराव फुले हे खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य होते. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्य व विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन जयंतीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली.

Reactions

Post a Comment

0 Comments