Hot Posts

6/recent/ticker-posts

कुरकुंभ ‘एमआयडीसी’तील सांडपाण्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यात यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

कुरकुंभ ‘एमआयडीसी’तील सांडपाण्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यात यावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश


मुंबई (क.वृ): कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रकल्पांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर ‘निरी’ (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) च्या अहवालानुसार प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

विधानभवन येथे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रकल्पामधून सोडण्यात येणारे दूषित सांडपाणी व वायुमुळे होणारे प्रदूषण, दौंड तालुक्यातील रस्ते व पुल, खडकवासला धरणाशी संबंधित कामांचा आढावा याबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार राहूल कुल, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, रस्ते सचिव उ.प्र. देबडवार, जलसंपदा सचिव संजय घाणेकर, उपसचिव अभय पाठक, ‘एमआयडीसी’चे सह कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ.सोनटक्के, मुख्य अभियंता सुभाष तुपे, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले म्हणाले, कुरकुंभ एमआयडीसी येथील पर्यावरण नियोजन आणि तंत्रज्ञान केंद्राचे काम प्रदूषण करणाऱ्या संस्थांना देण्यात येऊ नये. ‘एमआयडीसी’ भागात झालेल्या अपघातांच्या माहितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याचबरोबर शिरूर तालुक्यातील व न्हावरा-केडगाव-चौफुला रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासंदर्भात तसेच दौंड व शिरूर तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाच्या बांधकामासंदर्भात संबंधित  अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील आठ दिवसात कार्यवाही करण्यात यावी. जुना मुठा उजवा कालवामधील अस्तरीकरण कामासाठी एप्रिलपर्यंत निविदा काढण्यात यावी. तसेच, पुणे महानगरपालिकेला नियमानुसार पाणी देण्यात यावे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने वितरीत करण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण राहण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, असे निर्देशही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिले.

दौंड येथे निवासी शाळा सुरू करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या सूचनांची नोंद घेऊन शाळा सुरू करण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments