अन्यथा मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल- धैर्यशील मोहिते-पाटील

अकलूज दि.२९(क.वृ.): मराठा हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा समाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार मराठ्यांना टाळून वा वगळून करता येत नाही, मराठ्यांची जेवढी प्रगती होईल तेवढीच महाराष्ट्राची प्रगती होईल हेच सत्य आहे असे मत मांडत मराठा आरक्षणासाठी टोकाचा संघर्ष करू असे भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारच्या संशयास्पद भुमिकेमुळे मराठा समाज अस्वस्थ आहे.त्यातच काही "जाणते" नेते स्थगिती मिळाल्या नंतर वटहुकूम काढा म्हणून सांगत दिशाभूल करत आहेत असे म्हणत धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारच्या हलगर्जीपणा वर बोट ठेवत अनेक मुद्दे उपस्थित करत ते म्हणाले,कायदे तज्ञ असे सांगतात की मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळाने पारीत केलेले कायदा आहे. शिवाय मुबंई उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे.यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेलेली आहे. निकाल लागे पर्यंत कायदा अमान्य केलेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आहे. एखादा कायदा अस्तित्वात असेल तर वटहुकूम काढता येत नाही आणि काढायचा असेल तर कायद्याच्या सुधारणा करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य आहे असे तज्ञ सांगतात. मग जाणते नेते वटहुकूम कशाच्या आधारे सांगतात?
दुस-या बाजूला सरकारने दोन महीन्यापूर्वी EWS आरक्षणाचा लाभ मराठा समाजास घेता येणार नाही असा शासन निर्णय झाला होता.त्याचे कारण देताना मराठा समाजाला SEBC चे आरक्षण देण्यात आल्यामुळे EWS घेता येणार नाही म्हणून शासनाने स्पष्ट केले होते..सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 22 सप्टेंबरला बैठक घेऊन मराठा समाजाच्या अस्वस्थतेला शांत करण्यासाठी EWS चा लाभ घेता येईल इतकेच काय ते सांगितलं इथ हे लक्षात घ्या EWS मध्ये सर्वच आर्थिकदृष्ट्या मागास समाजाचा समावेश असल्याने त्याचा फायदा मराठा समाजाला किती मिळेल हे राज्य सरकार देखील छातीठोकपणे सांगू शकणार नाही.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ व सारथीची स्थिती जगजाहीर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अकरावी पासून ते वैद्यकीय प्रवेशाचा प्रश्न गडद झाला आहे. स्थगिती येण्यापूर्वी शासकीय नोकरीत ज्यांची ज्यांची भरती प्रक्रीया सुरू होती त्यांच्या नोकरीची हमी यावर राज्य सरकार बोलायला तयार नाही. नेमकी स्थगिती मिळाल्यानंतरच मेगा पोलीस भरती का काढण्यात आली? मराठा समाजाच्या प्रश्ना विषयी राज्य शासन गप्प का? असा सवाल ही धैर्यशील यांनी उपस्थित केला.राज्य सरकारने मराठा आरक्षणा वरील स्थगिती उठवण्यासाठी काय प्रयत्न करत आहे व स्थगिती नेमकी कधी उठवणार आहे हे मराठा समाजाला सांगावे सरकारने काल केलेल्या घोषणा म्हणजे तोंडाला पाने पुसण्यातला प्रकार आहे. सराकारने दिशाभूल न करता स्थगिती उठवण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत अन्यथा मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होईल असे म्हणत धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारला इशाराच दिला.
0 Comments