परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्पग्रस्तांच्या जागेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश |

मुंबई, दि.२५(क.वृ.): दाऊतपूर येथील 4 उमेदवारांनी परळी वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्प यामुळे प्रकल्पग्रस्त कोट्यातून महानिर्मिती कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी सादर केलेले दावे तपासून घेण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
परळी वैजनाथ औष्णिक वीज केंद्रामुळे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना महानिर्मिती कंपनीत नोकरी देण्याच्या संदर्भात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज फोर्ट येथील वीज कंपनीच्या कार्यालयात बैठक पार पडली.
या 4 उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र सादर केले असून सकृतदर्शनी प्रकल्पासाठी त्यांच्या जमिनी संपादित न केल्याने दर्शविलेल्या ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ भूसंपादनाचा अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ. राऊत यांनी संबंधितांना दिले असून त्यानंतर सदर दावे निकाली काढण्यात येणार आहे.
दाऊतपूर येथील 22 प्रकल्पग्रस्तांच्या प्रकरणातील 4 दावे वगळता उर्वरित सर्व दावे निकाली काढण्यात आले आहे. मात्र या 4 प्रकरणात सादर केलेले प्रमाणपत्र हे जरी वैध असले तरी या उमदेवारांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित न केल्याच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी संबंधित जागेवर पुन्हा भेट देऊन पाहणी करावी. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून अहवाल तयार करून सादर करण्यात यावा आणि या प्रकल्प ग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
0 Comments