उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृषीदिनाच्या शुभेच्छा! |
कृषीक्रांती आणि अन्नधान्यासंदर्भातील स्वयंपूर्णतेसाठी वसंतराव नाईक सदैव स्मरणात राहतील, प्रेरणा देतील - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
मुंबई, दि.30(क.वृ.): ‘कृषीक्रांती’ घडवून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब त्यांच्या दूरदृष्टी, व कर्तृत्वामुळे सदैव स्मरणात राहतील, त्यांचे विचार, कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा गौरव करुन अभिवादन केले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला ‘कृषीदिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे. अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. 1972 च्या दुष्काळाचं संकट त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने'तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. 'संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे' हा विचार त्यांनीच दिला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करतो. नाईक साहेबांनी दाखवलेल्या 'कृषी विकासा'च्या वाटेवरच सरकार वाटचाल करत असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 'कृषी दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments