महिलांमध्ये अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद : कुलगुरू
श्रमिक पत्रकार संघातर्फे प्रसारमाध्यमांतील महिलांचा सत्कार
सोलापूर - आज सर्व क्षेत्रात महिला कार्यरत झाल्या आहेत. त्या कोणत्याही क्षेत्रात कार्य करण्यास सक्षम असल्याचे त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले आहे. त्यामुळे महिलांमध्ये अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या हातात सत्ता दिल्यास त्या निश्चितपणे उत्कृष्ट आर्थिक नियोजन करतील, असा विश्वास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला.
शनिवारी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सोलापुरातील विविध वृत्तपत्रातील पत्रकार, वृत्त वाहिन्यांमधील निवेदिका आणि प्रसार माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वाती मन्सावाले, अस्मिता गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस समाधान वाघमोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या, महिला या कार्यक्षम आहेत. त्यामुळेच आज अनेक क्षेत्रात अग्रेसर होऊन काम करीत आहेत. प्रसार माध्यम क्षेत्रातही आज महिलांची संख्या वाढत आहे. विद्यापीठानेही प्रसार माध्यमात काम करणाऱ्यांसाठी विविध अभ्यासक्रम, कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यामध्ये नाट्य लेखन, सूत्रसंचालन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्रसार माध्यमात काम करणाऱ्या महिलांनी अशा प्रकारचे अभ्यासक्रम करून आपल्यातील कौशल्य अधिक विकसित करावे. शिक्षण, प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमाने आपल्यातील गुणवत्ता वाढत असते. त्यामुळे वेगवेगळ्या विषयावर स्तंभलेखन करणेही सोपे होणार आहे. स्तंभलेखनासाठी पर्यटन, कृषी, उद्योग, पर्यावरण असे अनेक विषय आहेत. त्यातून जनतेचे प्रबोधन होईल. या सगळ्या स्तंभलेखनाचा अभ्यासातूनच दर्जा वाढविता येणार आहे.
महिलांसाठी उद्योजकता हेही एक चांगले क्षेत्र आहे. या विषयावरही स्तंभ लेखन होण्याची आवश्यकता आहे. हे सगळे करीत असताना भाषा शुद्धी आणि भाषा समृद्धीचीही तितकीच गरज आहे. त्यासाठीही शिक्षण, प्रशिक्षण, अभ्यासक्रमाबरोबरच वाचनाचीही गरज असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी स्वाती मन्सावाले म्हणाल्या, आज समाजात अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहेच. त्याचबरोबर महिलांनीही आता घराबाहेर पडून काम करण्याची आवश्यकता आहे. अस्मिता गायकवाड म्हणाल्या, पत्रकार संघाच्यावतीने सत्कार होत आहे हे अभिनंदनीय आहेच. पण सोलापूरच्या महिला पत्रकारांनी काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ यात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला चोरगी यांनी केले तर आभार माधवी कुलकर्णी यांनी मानले.
0 Comments