जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा
पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या सूचना : व्हीसीव्दारे घेतला आढावा
सोलापूर : कोरोना विषाणूंच्या प्रार्दुभावाला प्रतिबंध करण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्याकडेही लक्ष द्या, अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज दिल्या.
पालकमंत्री़ दिलीप वळसे-पाटील यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सोलापूर जिल्ह्यात केल्या जाणा-या उपाययोजनांचा आज व्हिडीओ कॅान्फरन्सव्दारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहिती दिली. त्यामध्ये संचारबंदीची अंमलबजावणी, कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी केलेली उपाययोजना, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केलेले उपाय यांची माहिती दिली.
यावर पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संचारबंदीची अंमलबजावणी करा. मात्र नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल याची काळजी घ्यावी. शहरातील घरपोच धान्ये पुरविणाऱ्या दुकानदारांची यादी, संपर्क क्रमांक प्रसिद्ध करा जेणेकरून लोकांना घरपोच धान्ये मिळतील आणि गर्दी होण्यास अटकाव होईल, असे सांगितले.
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री तत्काळ खरेदी करावी. त्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जावेत. त्यावर आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक ढेले यांनी क्वारंटाईन कक्ष, आयसोलेशन कक्ष याची क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संतोष नवले आदी उपस्थित होते.
0 Comments