लोकमंगल कृषी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे दिनांक एक नोव्हेंबर रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवीन शिक्षण प्रणालीनुसार कृषी अभ्यासक्रमात दीक्षारंभ या विषयाचा समावेश करण्यात आला असून याद्वारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची ओळख, प्रक्षेत्र भेटी, मार्गदर्शन व्याख्याने आणि औद्योगिक संस्थांना भेटी इत्यादी उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात दीक्षारंभ तथा विद्यार्थी स्वागत समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा बँक ऑफ बरोडा, वडाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. सुमित कृपाळ हे लाभले होते. दीक्षारंभ कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, दीक्षारंभ विषयप्रमुख प्रा. नवनाथ गोसावी, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. सुजाता चौगुले आणि प्रथम वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधींच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मूर्ती पूजन करून करण्यात आली. सदरील स्वागत समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. राजनंदिनी कात्रे हिने मांडले. उपस्थित विद्यार्थ्यांना निखिल माळी याने प्रमुख अतिथी श्री. सुमित कृपाळ यांची ओळख करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या हस्ते श्री. सुमित कृपाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बॅग देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री. सुमित कृपाळ यांनी आपल्या जडणघडणीमध्ये लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा अतुलनीय वाटा असल्याचे विशेष नमूद केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सर्व सोयीसुविधांचा पुरेपूर वापर करून आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, बँकिंग पदव्युत्तर पदवी शिक्षण इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी याकरिता मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना एकका च्या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. यंदाच्या वर्षीचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार अंतिम वर्षातील विद्यार्थी विक्रम घोडके आणि उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार कु. गायत्री जाधव आणि कु. वैष्णवी जाधव यांना विभागून देण्यात आला. रासेयो विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक पृथ्वीराज इनामदार याने पटकाविले. गायत्री जाधव हिने आपल्या मनोगता मधुन राष्ट्रीय सेवा योजना एकक तथा महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे विशेष आभार व्यक्त केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्वागत समारंभाचा मुख्य हेतू सविस्तरपणे सांगितला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असून त्याकरिता अभ्यासासमवेत, कला, क्रीडा, मूल्यशिक्षण आणि सामाजिक क्षेत्र इत्यादी बाबतीमध्ये देखील महाविद्यालय विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. श्री. सुमित कृपाळ या सारख्या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नियमित स्वरूपात ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवावी हा मौलिक सल्ला त्यांनी दिला. औपचारिक कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी विलास पांढरे याने केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता बागुल आणि कु. वैष्णवी घोळवे यांनी केले.
दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना दीक्षारंभ विषय प्रमुख प्रा. नवनाथ गोसावी यांनी चलचित्रफितीच्या माध्यमातून कृषी पदवी शिक्षण तथा महाविद्यालयाचे विविधांगी उपक्रम याबाबत जागृत केले. यानंतर विद्यार्थ्याकरिता सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांनी सदरील कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद लुटला. सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवट हा प्रा. नवनाथ गोसावी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सदरील कार्यक्रमाचे स्तुत्य आयोजन व यशस्वी संपन्नतेसाठी परिश्रम घेतल्यामुळे त्यांनी याप्रसंगी त्यांचे विशेष कौतुक केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल माळी, पार्थ आदलिंगे, कु. श्रुती वीर आणि कु. माधवी झेंडगे यांनी केले. कु. वैष्णवी घोळवे हिने उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला. स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. दीक्षारंभ कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वी संपन्नतेसाठी प्रा. नवनाथ गोसावी, डॉ. परशुराम कांबळे आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्वच वर्षातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

0 Comments